संजीव कुळकर्णी

नांदेड : दीड वर्षांपूर्वी करोना व इतर गुंतागुंतींमुळे अकाली निवर्तलेले काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराला मोठा आधार दिल्यानंतर ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने कळमनुरीत येणारे खासदार राहुल गांधी आपल्या या विश्वासू सहकाऱ्याच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. खासदार राहुल गांधी यांची यात्रा ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात राहणार असून येत्या शुक्रवारी (दि.४ नोव्हेंबर) तेलंगणातील सुलतानपूर (जि.मेदक) येथे पूर्ण विश्रांती घेतल्यानंतर या भारत यात्रींनी नंतरच्या विश्रांतीसाठी कळमनुरीला पसंती दिली असल्याचे सांगण्यात आले.

कळमनुरी हा खूप जुना तालुका असला, तरी राजधानी दिल्लीतील काँग्रेस पक्षात माजी राज्यमंत्री श्रीमती रजनी सातव आणि त्यांचे पुत्र राजीव यांची कर्मभूमी म्हणून या गावाची खरी ओळख आहे. रजनीताईंनी १९८० ते ९० दरम्यान या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००९ मध्ये राजीव सातव येथून आमदार झाले. आता त्यांच्या पत्नी प्रज्ञाताई ह्या महाराष्ट्र विधान परिषदेवर आहेत.

हेही वाचा… सचिन कल्याणशेट्टी : समाजकारण आणि राजकारणाची हुकमी गोळाबेरीज

राजीव सातव यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्यांनतर २००८ पासून ते राहुल यांच्या थेट संपर्कात आले. त्यानंतर आमदार, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद, लोकसभा सदस्यपद अशा राजकीय उत्कर्षातून त्यांना गांधी कुटुंबाच्या निकट जाण्याची संधी मिळाली. राहुल यांची त्यांच्यावर खास मर्जी राहिली. दीड वर्षांपूर्वी राजीव यांना पुण्यात करोनासंसर्ग झाल्यावर तेथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले; पण २०२१ मधील १६ मे रोजी त्यांचे निधन झाल्याने काँग्रेसजनांना मोठा धक्का बसला. राजीव सातव यांनी पक्षाच्या गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी अत्यंत नेटाने सांभाळली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त करतानाच नंतर सातव परिवाराशी सतत संपर्क ठेवला.

हेही वाचा… बच्चू कडूंच्या शक्तीप्रदर्शनातून मंत्रिपदासाठी दबावगटाचे राजकारण?

राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या नियोजनात एक मोठा समूह कार्यरत असला, तरी ही यात्रा महाराष्ट्रात येत असताना यात्रेकरूंना राजीव सातव यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याचे यात्रेतील एक भारतयात्री श्रावण रॅपनवाड यांनी सांगितले. २००९ साली राजीव सातव यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी कळमनुरीत एक विशाल सभा घेतली होती. त्यानंतर ते यात्रेच्या निमित्ताने तेथे पुन्हा येत असले, तरी त्यांचा खंदा सहकारी काळाच्या पडद्याआड गेलेला आहे; पण कळमनुरीतल्या मुक्कामात ते राजीव सातव यांच्या समाधीस्थळी येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळमनुरी-हिंगोली रस्त्यावर सातव यांचे निवासस्थान असून या घरासमोरच्याच जागेमध्ये राजीव यांची समाधी आहे. याच निमित्ताने राहुल गांधी यांची रजनीताई आणि आमदार प्रज्ञाताई तसेच राजीव यांच्या दोन मुलांची प्रत्यक्ष भेट तेथे होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत निरोप आलेला नसला, तरी कळमनुरीच्या विश्रांतीच्या मुक्कामात (दि. १३) राहुल व इतर प्रमुख नेते सातव परिवाराची भेट घेऊ शकतात, असा अंदाज बांधण्यात आला आहे. या यात्रेचा तेथील मुक्काम सातव यांच्या महाविद्यालयासमोरच्या मोकळ्या जागेमध्ये राहणार आहे.