अलिबाग- भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी समाज माध्यमांवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत, आदिती तटकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटापाठोपाठ रायगड जिल्ह्यात भाजपही तटकरे कुटूंबावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रोहा येथील शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटूंब कल्याण विभागाच्या वतीने डायलिसिस सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. राज्यभर कार्यान्वित करण्यात येणाऱ्या डायलिसिस सेंटर योजनेचा भाग म्हणून या कक्षाची उभारणी करण्यात आली. शासकीय रुग्णालयातील या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ५ जुलै रोजी पार पडणार होते. यासाठी आरोग्य विभागाने जी निमंत्रण पत्रिका छापली होती. त्यात तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींना स्थानच दिले गेले नव्हते. खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील आणि आमदार महेंद्र दळवी यांचा पत्रिकेच्या निमंत्रण पत्रिकेत उल्लेखच करण्यात आला नव्हता. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची नावेही निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आली नव्हती, केवळ तटकरे कुटूंबातील लोकप्रतिनिधींचा निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख करण्यात आला होता.
त्यामुळे खासदार धैर्यशील पाटील चांगलेच संतापले होते. त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. रोहा तालुक्यात केवळ आपण आणि आपल्या घरातले आपण अशी नावे टाकण्याचा प्रघात कित्तेक वर्ष सुरू आहे. या प्रघाताशी अत्यंत प्रामाणिक राहात याही वेळेस रुग्णालयाच्या डायलिसीस सेंटरच्या उद्घाटनाची पत्रिका छापण्यात आली आहे. यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत. या सुविधेमुळे ग्रामिण भागातील किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अशा लोकउपयोगी अनेक योजना कार्यरत होत राहो, उपक्रमाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा… असे म्हणत पाटील यांनी तटकरेंच नाव न घेता निशाणा साधला.
धैर्यशील पाटील यांच्या या नाराजी नंतर आरोग्य विभागाने नवीन निमंत्रण पत्रिका छापली. ज्यावर आरोग्य मंत्री आणि स्थानिक आमदार खासदारांची नावांचा समावेश करण्यात आला. मात्र तरिही धैर्यशील पाटील यांच्या सह शिवसेना आणि भाजपचे आमदार या डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याकडे फिरकले नाहीत. आधीच रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष विकोलपाला गेले आहेत. या वादापासून भाजपने दूर राहण्याचे धोरण स्विकारले होते. मात्र भाजपकडून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटकरे कुटूंबाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केल्याने, जिल्ह्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्ह दिसत आहे.