अलिबाग- एके काळी रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, पक्षांतर्गत एकाधिकारशाही आणि विकासाला विरोध यामुळे गेल्या काही वर्षात पक्षाने आपला जनाधार गमावला, सातत्याने राज्यातील सत्तेपासून दूर राहण्याचे धोरण पक्षाच्यामुळाशी घातक ठरू लागले आहे, सत्तेचे लाभ मिळवण्यासाठी पक्षातील प्रस्तापित नेत्यांनी पक्षत्याग करत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे रायगड हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजपमध्ये डाव्या विचारांच्या नेत्यांचाच भरणा पहायला मिळतो आहे.

१९४८ साली स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षाने राज्याच डाव्या विचारांचा पाया रोवला, शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडत जनाधार प्राप्त केला. विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते पद भूषवण्याची संधी पक्षाला मिळाली. अनेक प्रतिभावान नेते पक्षाने राज्याला दिले. पक्षाच्या जडणघडणीत रायगड जिल्ह्याचे महत्वाचे योगदान राहिले. शेकापचा बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा, नारायण नागू पाटील, दि. बा पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, मोहन पाटील आणि मिनाक्षी पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलला. डाव्या विचारांचा आवाज जिल्ह्यात आणि राज्यात बूलंद ठेवण्याचे काम केले. मात्र आता पक्षाच्या लोकप्रियतेला जिल्ह्यात ओहोटी लागली आहे. जनाधार गमवालेला पक्ष अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करतांना दिसत आहे.

पक्षाच्या या कठीण काळात अनेक प्रतिभावान नेते पक्षाला सोडून जाऊ लागले आहेत. त्यामुळे पक्षाची वाटचाल अधिकच खडतर झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे शेकापला अखेरचा लाल सलाम करणारे सर्व नेते भाजपच्या कंपूत दाखल झाले आहेत. त्यामुळे शेकापची वाताहत होत असतांनाच भाजपचा उत्कर्ष सुरू झाला आहे. एकामागून एक येणाऱ्या शेकापमधून आलेल्या नेत्यांनी भाजपवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी भाजपच्या दिमतीला रायगड जिल्ह्यात डाव्या विचारांच्या नेत्यांची फौज पहायला मिळत आहे.

आधी पनवेल मधून रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर भाजपमध्ये दाखल झाले. नंतर पेण विधानसभा मतदारसंघात धैर्यशील पाटील आणि निलिमा पाटील यांनी शेकापला सुरूंग लावत भाजपमध्ये आले. अलिबाग विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यावरून पाटील कुटुंबात गृहकलह पेटला, त्यामुळे माजी आमदार पंडीत उर्फ सुभाष पाटील, माजी जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षत्याग केला. तेही भाजपच्या कंपूत दाखल झाले. उरण मधून भाजपच्या महेश बालदींना आव्हान देणारी शेकापकडून विधानसभा निवडणूक लढवणारे प्रितम म्हात्रे आणि जे. एम म्हात्रे हे दोघेही शेकापला लाल सलाम करत भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपमध्ये शेकापच्या नेत्यांचा आणि कर्यकर्त्यांचा भरणा झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपच्या पक्ष संघटनेवर या नेत्यांनी आता आपली घट्ट पकड बसवली आहे. दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्षपद खासदार धैर्यशील पाटील यांच्याकडे तर महिला आघाडीचे अध्यक्षपद चित्रा आस्वाद पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे एकेकाळी डाव्या विचारांची धुरा सांभाळणारे दोन्ही नेते आज पूरोगामी रायगड जिल्ह्यात हिंदूत्ववादी विचारसरणीच्या भाजपचा कारभार संभाळत असल्याचे चित्र सध्या रायगडच्या राजकीय पटलावर पहायला मिळत आहे.