दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कार्यकर्ते, नागरिक यांचा पूर्वीप्रमाणेच प्रतिसाद असल्याचा प्रत्यय आला. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची मुभा ठाकरे यांनी दिल्याने इच्छुकांचा उत्साह दुणावला असला, तरी गर्दी जमवणारे राज ठाकरे यांची व मनसेच्या स्थानिक नेत्यांची या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करताना याच
कसोटी लागेल. शिवशाहीर भक्त राज ठाकरे यांनी राजर्षी शाहू अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट घेऊन राजकीय परीघ वाढवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न उल्लेखनीय ठरला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेपासून किंबहुना त्या आधीपासून कोल्हापुरात राज ठाकरे यांच्या विषयीचे आकर्षण कायम राहिले आहे. राज यांनीही करवीर नगरीत मनसे रुजण्यासाठी सुरुवातीला लक्ष दिले. नंतर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रकडे दुर्लक्ष झाले. राज यांचे नेतृत्व-वक्तृत्व याचे तरुणाईला कमालीचे आकर्षण राहिले. या नवमतदारांना बांधून ठेवण्यासारखे सक्षम स्थानिक नेतृत्व विकसित झाले नाही. जिथे जिल्हाध्यक्ष हद्दपार होतो आणि नवीन नेतृत्व आयाराम -गयाराम अशा स्थितीत राहते, तेव्हा पक्ष वाढीला मर्यादा येणे स्वाभाविक असते. ही स्थिती बदलण्याचा राज ठाकरे यांच्या ताज्या दौऱ्यात प्रयत्न दिसला. पक्ष आणि स्थानिक नेतृत्व याचा कस निवडणुकीत लागत असल्याने राज यांनी महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी परवानगी देणार असल्याचे घोषित केले. मनसे निवडणुकीत झेप घेण्यास सज्ज आहे. इच्छुकांना निवडणूक कोणत्या विकास कामासाठी लढवणार आहे; याची माहिती ‘कृष्णकुंज’ला पाठवावी लागेल. ती तपासून पात्र उमेदवाराला पक्षाकडून हिरवा कंदील दर्शवला जाणार आहे.

हेही वाचा: मराठवाड्यात राज्यपालांविरोधात आंदोलनात राष्ट्रवादी आस्ते कदम

राज ठाकरे यांच्या कसोटीला जिल्ह्यातील किती उमेदवार उतरणार आणि त्यापैकी किती जणांच्या अंगाला गुलाल लागणार यावर मनसेच्या स्थानिक नेतृत्वाची उंची दिसून येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक खुजे नेतृत्व फुटकळ आंदोलनापुरतेच मर्यादित आहे. त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह आहे. निवडणूक आखाड्यात अशा बोलबच्चन नेतृत्वाचा कस लागणार आहे. कोल्हापूरच्या पाकीट संस्कृतीमुळे राज्यातील राजकारणाचे नुकसान झाले, असे टोकदार विधान करून राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील अन्य पक्षीय नेतृत्वाला डिवचले. याचवेळी लोकांनी मतदारांनी पाकीट संस्कृतीचे पैसे घ्यावेत पण मतदान मनसेला करून घ्यावे, असा सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत. त्यांच्या या वक्तव्याला वादाची किनार लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी, कोल्हापूरकर पैशापुढे झुकत नाही. येथील जनता पैशाला भीक घालत नाही, असा टोला ठाकरे यांना लगावला.

हेही वाचा: दादा भुसेंच्या पुत्राच्या वाढदिवस फलकांनी भाजप अस्वस्थ

राज ठाकरे आपल्या राजकीय दौऱ्यांमध्ये समाजातील लेखक, कलाकार, संशोधक मंडळींना नेहमी भेटतात. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतात. समाजातील सर्व घटकांशी चर्चा करणे त्यांच्याकडून समाजस्पंदने जाणून घेणे, अनेक जटील प्रश्न समजून घेणे असे या भेटीमागचा हेतू अनेकदा दिसून आला आहे. कोल्हापूर दौऱ्यातही राज ठाकरे यांनी राजर्षी शाहू चरित्र ग्रंथाचे लेखक, इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांची आवर्जून भेट घेतली. या वेळी इतिहासातील काही कोड्यांपासून ते इतिहास संशोधनातील कार्यापर्यंत विविध अंगाने घडलेला हा संवादही चांगलाच गाजला. एखाद्या प्रश्नाला थेट भिडण्याची, त्याची जबाबदारी घेण्याची राज ठाकरे यांची ही वृत्ती पाहून डॉ. पवार यांनीही या वेळी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. एखाद्या भागात गेल्यावर तिथे समाजात फिरताना माणसे जोडण्याची, जिंकून घेण्याची ही वृत्ती, त्यातून समाजमनाशी जोडले जाण्याचा त्यांच्या स्वभावाचा प्रत्यय या वेळीही कोल्हापूरकरांना आला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray attempt to widen political circle in kolhapur tour mns meet dr jaising pawar western maharashtra print politics news tmb 01
First published on: 04-12-2022 at 13:04 IST