Top Political News of Maharashtra: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन युतीची घोषणा करतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या ऊसात काटा मारणारे कारखाने मी शोधून काढले आहेत. त्या कारखान्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच अजित पवारांविषयी मोठे षड्यंत्र सुरू असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. रमी प्रकरणात रोहित पवारांनी माफी मागावी अशी मागणी माणिकराव कोकाटेंकडून करण्यात आली आणि आनंदाचा शिधा ही सरकारची योजना का बंद करण्यात आली, याचे कारणही पुढे आले. आज दिवसभरात घडलेल्या या पाच महत्त्वांच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

राज-उद्धव पाच महापालिका एकत्र लढवणार

  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पुन्हा एकदा भेट झाली.
  • मुख्य म्हणजे या भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा राजकीयच असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
  • राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांमध्ये मागच्या तीन महिन्यांत पाच भेटी झाल्या आहेत.
  • संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन युतीची घोषणा करतील.

मुंबईसह महाराष्ट्रात २७ महापालिका आहेत. हा काही खेळ नाही. प्रत्येक जागांवर, पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे. प्रत्येक महापालिकेची परिस्थिती वेगळी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सगळीकडे परिस्थिती वेगवेगळी आहे. या सगळ्यावर आमच्या चर्चा होत आहेत. प्रत्येक महापालिकेत दोन्ही पक्षांचे प्रमुख लोक चर्चा करत आहेत,” असे ते म्हणाले.

“मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकमत आहेच. शिवाय अनेक महापालिका आहेत जिथे शिवसेना आहे. मनसेची मदत कुठे घेता येईल? राष्ट्रवादीची ताकद जिथे आहे तिथे त्यांची मदत घेऊ. मुंबईचा महापौर मराठी होईल, मराठी बाण्याचा माणूस होईल,” असेही ते म्हणाले.

साखर कारखान्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

लोणी येथे रविवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचे संकेत दिले. राज्यातील साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र सरकारने त्यांना मदतीचा हात दिला, मात्र आता शेतकऱ्यांवर संकट असताना काही कारखानदारांना नफ्यातून फक्त ५ रुपये देणेही जड जात आहे, शेतकऱ्यांच्या ऊसात काटा मारणारे कारखाने मी शोधून काढले आहेत. त्या कारखान्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

साखर कारखान्यांमध्ये ३० हजार कोटींचे व्यवहार होत आहेत. सरकार कारखान्यांना १० हजार कोटी देत आहे, तर मग तुमच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी ५ रुपये बाजूला काढून ठेवा. आम्ही ते पैसे एफआरपीमधून मागितले नव्हते. एफआरपीमधील पैसे शेतकऱ्यांचे आहेत आणि नफ्यातील पैसे हे कारखान्यांचे आहेत, असे फडणवीस पुढे म्हणाले.

अजित पवारांविषयी षडयंत्राचा दावा

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी एक मोठा दावा केला आहे. “अजित पवारांविषयी मोठे षड्यंत्र सुरू आहे”, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. अलिबाबा म्हणजेच भुजबळ आणि परळी गँग अशा दोन-तीन जणांकडून अजित पवारांना संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा मोठा आरोप जरांगे यांनी केला आहे.

“अजित पवार यांच्याबाबतदेखील मोठे षड्यंत्र सुरू आहे. परळीचे घराणे शक्यतो अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हते, कारण परळीचे अर्धे घराणे संपले होते. मात्र, पवारांमुळे मुंडेंचे अर्धे घराणे मोठे झाले. तेदेखील भुजबळांच्या या षड्यंत्रामध्ये सहभागी झाले आहेत, कारण यांना ज्यावेळी कोणी मदतीचा हात देत नव्हते, त्यावेळी त्यांनी मदतीचा हात दिला. आता अजित पवारांनी मोठे करूनदेखील या अलिबाबाने आणि आणखी दोन ते तीन जणांनी हा प्रयत्न आतून सुरू केला आहे,” असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

रोहित पवारांनी माफी मागावी अशी माणिकराव कोकाटेंची मागणी

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र, आपण रमी खेळत नव्हतो, असा दावा कोकाटेंनी केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेंवर परखड शब्दांत टीका केली होती. तसेच, कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. आता माणिकराव कोकाटेंनीच रोहित पवारांच्या माफीनाम्याची मागणी केली आहे.

“शेतकऱ्यांमध्ये, माझ्या पक्षात बदनामी झाली आहे. माझ्या पक्षाच्या नेत्याची बदनामी झाली आहे. पर्यायाने माझीही बदनामी झाली आहे. माझी प्रतिमा डागाळली गेली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आमची माफी मागावी, अशी नोटीस मी त्यांना पाठवली. पण, त्यांनी त्या नोटीसची खिल्ली उडवली”, असे कोकाटे म्हणाले.

राज्य सरकारने आनंदाचा शिधा का बंद केला?

राज्य सरकारने आनंदाचा शिधा का बंद केला?

गणेशोत्सवापाठोपाठ यंदा दिवाळीतही गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळणार नाही, त्यामुळे राज्य सरकारने ही योजना बंद केल्याची चर्चा सुरू आहे. योजनेअंतर्गत प्राप्त होणारे चारही जिन्नस एकाच वेळी लाभार्थ्यांना वितरण करणे अपेक्षित होते. मात्र कधी साखर, तर कधी तेल उपलब्ध होत नसे आणि त्यामुळे शिधा वितरणाचा वांरवार बोजवारा उडत होता. वेळेत आनंदाचा शिधा प्राप्त होत नसल्याने, लाभार्थी शिधा खरेदीकडे पाठ फिरवायचे, त्यामुळे धान्य वितरकांची मोठी अडचण व्हायची; याच कारणाने ही योजना टीकेची धनी ठरत गेली. आनंदाचा शिधा पाठवूच नका अशी मागणी रास्त भाव दुकानदार आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून गेल्या वर्षी करण्यात आली होती, त्यामुळे राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने ही योजना बंद केल्याची चर्चा सुरू आहे.