Latest News on Maharashtra Politics Today : ‘बाळासाहेबांच्या बोटांचे ठसे घेतले गेले, मी खोटे बोलतोय हे उद्धव ठाकरेंनी सांगून दाखवावे’, असे आव्हान शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले. ‘माझ्या नादी लागलात तर तुमच्यासह अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीचा देव्हारा करीन’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना दिला. उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली. इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी फडणवीसांवर केली. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. महाराष्ट्रातील या पाच महत्वाच्या राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
रामदास कदम यांचे ठाकरेंना आव्हान
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा लक्ष्य केले. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले होते, मी खोटे बोलतोय हे उद्धव ठाकरे यांनी सांगून दाखवावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. बाळासाहेबांच्या मृतदेहाचा दोन दिवस छळ करण्यात आल्याचा आरोपही कदम यांनी केला. अंबादास दानवे मला काय शिकवणार मीच त्यांना निवडून आणले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत जर मी खोटे बोलत असले तर माझी आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी. बाळासाहेब ठाकरेंच्या बोटांचे ठसे नेमके कशासाठी वापरण्यात आले, याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले. रामदास कदम यांच्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. या आरोपांना नेमके कसे प्रत्युत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा
‘माझ्या नादी लागलात तर तुमच्यासह अजित पवारांच्या राजकीय करिअरचा देव्हारा करीन’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंना दिला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मुंडेंनी गुरुवारी भगवान गडावरील दसरा मेळाव्यातून केली होती. त्यांच्या या मागणीवर जरांगे यांनी संताप व्यक्त केला. प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधताना धनंजय मुंडेंना लक्ष्य केले. ‘तुम्हाला स्पष्ट सांगतो की शहाणपणा करू नका, मी कुणालाही मोजत नसतो. माझ्या नांदी लागलात तर तुमच्यासह अजित पवार यांच्याही राजकीय कारकीर्दीचा देव्हारा करीन’, असे जरांगे म्हणाले. ‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. त्यांना दिवाळीपूर्वी मदत जाहीर करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभे करू’, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
आणखी वाचा : RSS च्या मुशीतून घडलेल्या भाजपाच्या माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; कोण आहेत अनिल जोशी?
मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली
मुंबईतील दादर येथील शिवार्जी पार्क मैदानावर गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी भाजपासह महायुती सरकारला लक्ष्य केले. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली. ‘मी जे काही बोललो होतो, ते त्यांनी (उद्धव ठाकरे) सत्य करून दाखवले आणि माझे हजार रुपये वाचवले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो’, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. मुंबईत माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मी आव्हान दिले होते की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासासंदर्भातील एकही मुद्दा दाखवा आणि हजार रुपये मिळवा. काल मी त्यांचे भाषण ऐकले आणि पत्रकारांना विचारले की मला खरेच हजार रुपयांचा फटका बसेल का? उद्धव ठाकरे काही तरी विकासावर बोलले का? त्यांच्या संपूर्ण भाषणात ते विकासासंदर्भातील एकही मुद्दा बोलले नाहीत. मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की त्यांनी माझे १००० रुपये वाचवले’, असे फडणवीस म्हणाले.
बच्चू कडू यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका
राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून बँकांना कुठलीही वसुली करू देणार नाही. पुढील तीन महिने पूरग्रस्तांना कुठलाही त्रास होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावर माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. ‘आता पुढे काय चमत्कार होणार आहे, की तुम्ही महापूजा ठेवली आहे. तीन महिन्यानंतर काय गेलेले पीक उभे राहणार आहे. इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री तर मी आयुष्यात पाहिला नाही. मुख्यमंत्री इतके बनावट आहेत की त्यांची झेरॉक्सच निघत नाही, अशी बोचरी टीका बच्चू कडू यांनी केली. ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार २०१९ मध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये इतकी मदत देण्यात आली होती. २०२१ मध्ये सरकारने शेतकऱ्यांना दुप्पट १३ हजार ६०० रुपये मदत दिली. आता २०२५ मध्ये शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये इतकीच मदत मिळणार आहे. सरकारने मदतीची रक्कम का कमी केली, याचे कारण सांगितले पाहिजे, असेही कडू म्हणाले.
मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण… : पंकजा मुंडे
मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे भावनिक आवाहन भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना मी अठरा पगड जातीसाठी लढत आहे. त्यांनी (स्व. गोपीनाथ मुंडे) मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही, उटल या मागणीला समर्थनच दिले, असेही त्या म्हणाल्या. गुरुवारी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन केले. यावेळी माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार धनंजय मुंडे, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे तुकडे उचलू नका, कुणाचे पैसे घेऊ नका, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.