सातारा : साताऱ्यातील फलटणच्या राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर एकतर्फी मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. फलटणच्या विकासाचे राजकारण करायचे असेल तर मनोमिलन होईल. मात्र सत्तेचे राजकारण थांबले पाहिजे यासाठी हे मनोमिलन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रामराजेंच्या वक्तव्याला अजून रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी प्रतिसाद दिलेला नाही. मात्र रामराजेंच्या या भूमिकेने मात्र पुन्हा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मागील अनेक वर्षापासून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजीत सिंह नईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजप भारतीय जनता पक्षाची युती असतानाही लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला होता. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व काही विसरून रामराजे नाईक निंबाळकर यांचे उमेदवार दीपक चव्हाण यांची उमेदवारी सुरुवातीला जाहीर केली होती. मात्र त्यावेळी रामराजेंनी अजित पवार पक्ष न सोडता दीपक चव्हाण यांना शरद पवार पक्षातून उभे केले. या निवडणुकीत दीपक चव्हाण यांचा पराभव झाला आणि रणजीतसिंह निंबाळकर यांचे विश्वासू सचिन पाटील निवडून आले. यानंतर झालेल्या राजकारणात फलटणच्या रामराजेंचा गट मोठ्या प्रमाणात रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी फोडला.
रामराजेंच्या अनेक मातब्बरांनी त्यांच्या गटाला रामराम ठोकत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व स्वीकारले. त्याची सल रामराजेंच्या मनात आहे. त्यामुळे रामराजेंच्या मनोमिलनाच्या वक्तव्यातून रणजीतसिंह निंबाळकरांच्या गटात गेलेल्या गेलेल्यांची मात्र मोठी गोची करण्यात रामराजे सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
आज पर्यंत फलटणचे राजकारण हे रामराजेंच्या कुटुंबाभोवती फिरत राहिले आहे. रामराजे यांचे या राजकारणावर वर्चस्व राहिले आहे. मात्र रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशानंतर मागील लोकसभा निवडणुकीत रणजीतसिंह खासदार झाल्यानंतर रामराजेंच्या अनेक वर्षांच्या राजकारणाला आव्हान उभे राहिले. अद्यापही रामराजेंचे वर्चस्व दिसत असले तरी प्रत्यक्षात रामराजे पहिल्यांदाच राजकीय वर्चस्वासाठी दोन पावले मागे आल्याचेही दिसत आहे. राजकीय पीछेहाट टाळण्यासाठी रामराजेंचे आजपर्यंतच्या राजकारणात असे वक्तव्य पहिल्यांदाच आल्याचे दिसून आले आहे. तसेच सध्याच्या राजकारणात रामराजे कोणाविरुद्धही राजकीय लढाईच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्यामुळे मनोमिलन हा शब्द वापरून त्यांनी सध्या तर मतदारसंघात राजकीय गोंधळ उडवून दिला आहे. याला अद्याप तरी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
रामराजे, रणजितसिंह आणि जयकुमार गोरे यांनी एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या थंडावल्या आहेत. आपआपल्या तलवारी त्यांनी मॅन केल्या आहेत. मात्र दोघांचे मनोमिलन होत असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ज्यांनी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गट बदलले आहेत, त्यांची मात्र मोठी गोची करण्यात रामराजे सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. फलटणच्या राजकारणात रामराजेंना पर्याय तयार झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीत गट सोडून जाण्यापासून थोपविण्यासाठी केलेली रामराजेंची ही खेळी असू शकते.मागील काही दिवसांपासून फलटणच्या राजकीय क्षेत्रात मनोमिलनाचे वारे वाहत आहे. या दोघांचे मनोमिलन होणार की नाही, याबाबत फलटणच्या जनतेच्या मनात मात्र उत्सुकता आहे. या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मात्र बारकाईने लक्ष आहे. काही केल्या ते साताऱ्याचे राजकारण सोडण्याच्या तयारीत सध्या तरी दिसत नाहीत.
काय म्हणाले रामराजे ?
मनोमिलन दोन मनांचे होत असते. त्यामुळे दुसऱ्या मनाला आधी विचारलं पाहिजे. त्यांचे व माझे मनोमिलन व्हायला आमचा विरोध नाही. मनोमिलन हा प्रश्न माझ्या एकट्याचा नसून फलटणच्या विकासाचा आहे.मनोमिलन एकतर्फी प्रेमातून होत नाही. फलटणच्या विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. मात्र सत्तेचा राजकारण थांबले तर विचार करू. मनोमिलन वरिष्ठांनी सांगितले तर होईल. नाही तर होणार नाही, असे सूचक वक्तव्यही रामराजेंनी केल्याने दोघांचे पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोमिलन हे फलटणच्या विकासाच्या राजकारणासाठी गरजेचे आहे, मात्र यातून राजकारण थांबले पाहिजे.राजकारण थांबले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत आत्तापर्यंतच्या विकासाबाबत काय बोलायचं ते आम्ही त्यावेळी बोलू – रामराजे नाईक निंबाळकर.