रत्नागिरी : देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असताना कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमकी सुरु झाल्या असून‌ या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला या दोन नेत्यांच्या संघर्षाची किनार निर्माण झाली आहे.

गेल्या ४-५ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यात झालेल्या संवाद सभांमध्ये आमदार जाधव यांनी राणेंसह त्यांच्या दोन्ही मुलांवर पातळी सोडून टीका केली. पण ते त्यांनी भावनिक होऊन केलं नव्हतं. राणे पिता-पुत्रांना त्यांनी मुद्दाम डिवचलं आणि या सापळ्यात अडकून राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश यांनी, याबाबतचा हिशेब आपण लवकरच जाधवांच्या गुहागर मतदारसंघात जाऊन चुकता करू, असा सज्जड इशारा दिला. स्वतः नारायण राणे यांनीही, यापुढे आपण जाधवांना उत्तर देणार नाही, चोप देणार, अशी थेट धमकीच दिली.

हेही वाचा – समाजवादी पक्षाला आणखी एक धक्का! पाच वेळा खासदार राहिलेल्या सलीम शेरवानींनी दिला पक्षाचा राजीनामा; नेमकं कारण काय?

जाहीर कार्यक्रमानुसार गेल्या शुक्रवारी निलेश यांनी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी इथं सभा घेऊन जाधव यांच्यावर अतिशय शिवराळ भाषेत टीका केली. हा विषय एवढ्यावरच मिटला असता तरी फारसा प्रश्न निर्माण झाला नसता. पण या सभेसाठी येताना निलेश यांनी चिपळूणजवळच्या रस्त्याने थेट गुहागरला जाण्याऐवजी महामार्गावरून सरळ पुढे येत भास्कर जाधव यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. त्यांच्या गाड्यांचा ताफा तिथून जात असताना स्वतः आमदार जाधव कार्यकर्त्यांसह तिथे उपस्थित होते. एकदा तर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत तिथं उभ्या केलेल्या लोखंडी अडथळ्यांवर चढून दंड थोपटत आव्हान दिल्याचे आविर्भाव केले. स्वाभाविकपणे त्यांचे कार्यकर्ते आणखी चेकाळले आणि राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक सुरू झाली. अर्थात निलेश यांचे कार्यकर्तेही बहुधा तयारीतच होते. त्यांनीही दगडांनी प्रत्युत्तर दिलं. यामुळे निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी अश्रूधूर व लाठीमाराचा अवलंब करत जमाव पांगवला आणि निलेश यांचा ताफा सभेकडे मार्गस्थ केला.

गुहागरातील तमाम संस्कृतीसंरक्षकांच्या कानांना दडे बसवणाऱ्या अर्वाच्य शब्दांचा जाधवांवर वर्षाव करून भाषणाच्या अखेरीस नीलेश यांनी, पोलिसांनी कितीही संरक्षण दिलं तरी आपण आता भास्करला सोडणार नाही. तुम्ही आमच्यावर दगड टाकले. आता मी काय पाठवतो ते बघा, असा खास ‘राणे शैली’त दमही दिला.

हेही वाचा – ‘सडक पे स्कूल’ अभियान सुरू करणारे दलित नेते, ते हत्या प्रकरणातील दोषी; कोण आहेत मनोज मंझील?

अर्थात या ताज्या घटनांना सुमारे बारा वर्षांच्या जाधव-राणे संघर्षाचा इतिहास आहे. त्यावेळी आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर नारायण राणे काँग्रेस पक्षामध्ये होते आणि दोघेही तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये मंत्री होते. २०११ मध्ये चिपळूण तालुक्यात सावर्डे इथं एका मेडिकल स्टोअर्सचं उद्घाटन करताना आमदार जाधव यांनी मंत्री राणे यांची खालच्या शब्दात संभावना केली आणि संघर्षाची पहिली ठिणगी पडली. त्यावेळी निलेश राणे काँग्रेसचे खासदार होते. आपल्या पिताजींबद्दल आमदार जाधव यांनी काढलेले अनुद्गार जिव्हारी लागलेल्या निलेश यांच्या कार्यकर्त्यांनी ७ नोव्हेंबर २०११ रोजी चिपळूणमधील आमदार जाधव यांच्या कार्यालयाची भरपूर नासधूस केली. हा प्रकार घडला तेव्हा स्वतः निलेशसुद्धा तिथं उपस्थित होते, असा आरोप करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष तोडफोडीत ते सहभागी नव्हते. या घटनेमुळे प्रक्षुब्ध जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमार्फत नारायण राणे यांना त्यांच्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. अखेर दोन्ही बाजूंच्या वरिष्ठांनी हस्तक्षेप करून ही आग विझवली. पण ती आतमध्ये धुमसतच होती आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं निमित्त साधून आमदार जाधवांनी पुन्हा फुंकर मारत ती चेतवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०११ मध्ये राजकीयदृष्ट्या दोघेही जण एकाच आघाडीत असल्याने किती ताणायचं, याला काही मर्यादा होत्या. दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेतेही सार्वजनिक ठिकाणी बोलण्याच्या भाषेबाबत संवेदनशील होते. आता दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या तर विरोधी गटांमध्ये आहेतच, पण या दोन्ही गटांचे वरिष्ठ नेतेसुद्धा जाहीर वक्तव्यांबाबत फारसा विधिनिषेध न बाळगणारे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या धुमशान सुरू झाल्यावर कोकणात शिमगा जास्तच रंगण्याची चिन्हं आहेत.