नागपूर: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण याचा नुकताच झालेला नागपूर दौरा सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्या भेटी घेतल्या आणि परतही गेले. ते येणार याची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणाला नव्हती, माध्यमांनाही कळवण्यात आले नाही, त्यांनी स्वत:हून विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली नाहीत. एकणच सर्वकाही पूर्वीच्या भाजप परंपरेप्रमाणे. हे सर्व मागचे कारण चव्हाण यांची यापूर्वीच्या अध्यक्षांपेक्षा वेगळी असलेली कार्यशैली. गाजावाजा कमी आणि कामावर लक्ष्य हे त्यांच्या देहबोलीतून दिसून आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रदेश भाजपाने काही सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला होता. त्याला अनुसरूनच एक कार्यक्रम नागपूर भाजपने आयोजित केला होता. त्याच्या उद्घाटनाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नागपुरात आले होते. हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात होता. सकाळच्या विमानाने रवींद्र चव्हाण नागपुरात आले. मोजकेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन केले.

नंतर स्थानिक पदाधिकारी, नेत्यांशी चर्चा करून ते परत गेले. त्यांच्या दौऱ्याचा कुठेच गाजावाजा करण्यात आला नाही, माध्यमांनाही कळवण्यात आले नाही, त्यांनी पत्रकार परिषदही घेतली नाही. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांसाठी हा बदल एकूणच धक्कादायक होता. यापूर्वीच्या अध्यक्षांचा कोणताही कार्यक्रम मिडीयाच्या उपस्थिती शिवाय होतच नसे. केलेल्या कामाचा प्रचार आणि प्रसार यात ते वाकबगार मानले जातात. कार्यक्रमस्थळी, विमानतळावर जाताना किंवा येताना त्यांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद ठरलेला. ही पार्श्वभूमी लक्षात घेता चव्हाण यांनी त्यांच्या दौऱ्यात या सर्व बाबींना फाटा देऊन वेगळेपण दाखवला.

यापूर्वीही ते कार्यकारी अध्यक्ष असताना नागपूरमध्ये येऊन गेले. विभागपातळीवरच्या बैठका त्यांनी घेतल्या, पक्ष कार्यालयात पूर्ण वेळ बसून कार्यकर्ते, नेत्यांशी संवाद साधला होता, पण हे सर्व ते नागपूरहून गेल्यावरच कळले. आता पूर्ण वेळ अध्यक्ष झाल्यावरही चव्हाण यांनी त्यांची कार्यशैली तीच कायम ठेवली, असे त्यांच्या नागपूर दौऱ्यावरून तरी दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसिद्धीचा अतिरेक

२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हापासून भाजपचा पक्ष म्हणून चेहरामोहराच बदलला. नागपुरात पक्षाचा कोणताही कार्यक्रम त्याच्या प्रचार प्रसारासाठी मोठी यंत्रणा राबवली जाते. पत्रकार परिषद, प्रसिद्दी पत्रक, आरोप-प्रत्यारोपाच्या माध्यमातून पक्ष व स्थानिक नेते सतत प्रसिद्धीच्या झोतात राहतात. अतिरेकी प्रचाराचा अनेकदा स्थानिक नेत्यांना फटकाही बसतो. कदाचित याची जाणीव झाल्यामुळेच चव्हाण यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात या सर्व गोष्टीला फाटा दिला असावा, अशी चर्चा आहे.