प्रसाद रावकर

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग आरक्षणाची सोडत पार पडली आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मुंबापुरीत राजकारणाने वेग घेतला. सोडतीमध्ये काँग्रेसच्या २९ पैकी २१ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने प्रभाग रचनेसह सोडतीविरोधात आक्रमक भूमिका घेत कॉंग्रेस नेत्यांनी शिवसेनेशी उभा दावा मांडला आहे. त्यामुळे भाजपविरोधातील सत्तासंघर्षात जो कॉंग्रेस पक्ष शिवसेनेचा जोडीदार ठरू शकला असता तो महापालिका निवडणुकीच्या लढाईआधीच विरोधकाच्या भूमिकेत गेल्याने शिवसेना एकाकी पडण्याचा धोका असून भाजपला मात्र शिवसेनेला खिंडीत गाठण्याची एक आयती संधी मिळाली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी २३६ प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सोडतीमध्ये अनुसूचित जातींसाठी १५, तर अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग आरक्षित झाले. तर सर्वसाधारण प्रवर्गामध्ये २१९ प्रभागांचा समावेश करण्यात आला. २३६ पैकी ११८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले असून त्यात अनुसूचित जातींसाठी आठ, अनुसूचित जातीसाठी एक, तर सर्वसाधारण प्रवर्गात १०९ प्रभाग आरक्षित झाले. तर ११० प्रभाग खुले झाले असून या प्रभागांतून उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांमध्ये स्पर्धा लागण्याची चिन्हे आहेत. सोडतीत प्रभाग आरक्षित झाल्याने शिवसेनेतील माजी नगरसेवकांपैकी विश्वनाथ महाडेश्वर, यशवंत जाधव, आशीष चेंबूरकर, मंगेश सातमकर, अनिल कोकीळ, अमेय घोले, संजय घाडी, विठ्ठल लोकरे, राजू पेडणेकर, सदानंद परब, स्वप्नील टेंबवलकर आदींसमोर पेच निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आरक्षणामुळे भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, अभिजीत सामंत, विनोद मिश्रा, जगदीश ओझा, आकाश पुरोहित, नील सोमय्या, हर्ष पटेल, मकरंद नार्वेकर, अतुल शाह, शिवकुमार झा आदींनाही नवा प्रभाग शोधावा लागणार आहे.

पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, काँग्रेसचे माजी नगरसेवक अश्रफ आझमी, आसिफ झकेरिया, वीरेंद्र चौधरी, सुफियान वणू आदींच्या प्रभागावरही आरक्षणाची कुऱ्हाड कोसळली आहे. सोडतीमध्ये काँग्रेसच्या २९ पैकी २१ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यानेच काँग्रेसमध्ये असंतोषाचा स्फोट झाला आहे. काँग्रेस संपविण्याचा हा घाट असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे, तर या सोडतीविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला आहे. हा थेट शिवसेनेच्या हेतूवरच संशय आहे. मुळात प्रभाग रचना जाहीर झाल्यावरही कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यात आता कॉंग्रेसच्या २१ माजी नगरसेवकांचे प्रभागच आरक्षित झाल्याने असंतोषाचा भडका उडणे स्वाभाविक होते.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपने शिवसेनेला जवळपास गाठले होते. मनसेचे नगरसेवक व इतर अशी मोळी बांधून भाजप महापालिका ताब्यात घेऊ शकली असती. पण  त्यावेळी राज्यातील भाजपची सत्ता स्थिर ठेवण्यासाठी शिवसेनेला महापालिकेतील सत्ता देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना-भाजप युती राज्यात तुटलेली असल्याने कसेही करून शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता आपल्याकडे खेचायचीच असा चंग भाजपने बांधला आहे. मुंबईतील निवडणुकीत निर्णायक ठरणारे उत्तर भारतीय, गुजराती मतदार पूर्णपणे आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश येऊ लागले आहे. तर शिवसेनेचा आधार असलेला मराठी मतदार हा शिवसेना, भाजप व मनसे अशा तीन ठिकाणी विभागला जाईल असे डावपेच आखले गेले आहेत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत सत्ता राखणे हे शिवसेनेसाठी मोठे आव्हान आहे. त्यात राज्यातील सत्तेत सहकारी असलेला कॉंग्रेस हा शिवसेनेचा संभाव्य जोडीदार ठरला असता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने वेळप्रसंगी नक्कीच शिवसेनेच्या बाजून कौल दिला असता. पण आता आरक्षण सोडतीमधील वादामुळे भाजपसोबतच्या सत्तासंघर्षातील हा भावी जोडीदार थेट शिवसेनेचा विरोधक झाला आहे. त्यामुळे भाजप या दुहीचा राजकीय लाभ उठवण्याचा व शिवसेनेला एकाकी पाडून खिंडीत गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे.