सांंगली : सांगली मतदारसंघ भाजपच्यादृष्टीने कालपरवापर्यंत सुरक्षित वाटत असताना माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिलेला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा आणि माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केलेली खदखद भाजपची चिंता वाढविणारी वाटत आहे. पक्षांतर्गत असंतोष जगताप यांच्या कृतीने बाहेर आला आहे. एकेकाळी आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला दुष्काळी फोरम आता नव्या रूपात समोर येऊ पाहत आहे. नजीकच्या काळात हा असंतोष बंडखोर असलेले विशाल पाटील यांच्यासाठी संघटित झाला तर अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना तिसर्‍यांदा उमेदवारी देत हॅटट्रिक करण्याची संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीतही पाटील यांच्या विरुद्ध पक्षात मोर्चेबांधणी झाली होती. मात्र, उमेदवाराचा चेहरा नसल्याने पक्षाने दिलेली संधी खासदार पाटील यांना साधता आली. मात्र, यावेळी माजी जिल्हाध्यक्ष देशमुख हे उमेदवारीसाठी गेली दोन वर्षे प्रयत्नशील होते. आपणाला उमेदवारी मिळणार हे ठासून सांगत होते. या दिशेने त्यांनी मतदारसंघात मित्रही जोडले होते. खासदारांनी पक्ष वाढीसाठी अथवा पक्षाच्या कार्यक्रमाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र पक्षाबाहेरचे मित्र जोडत असताना पक्षाच्या निष्ठावंत गटावर अन्याय केला. त्यांची कामे अडविण्याचा प्रयत्न केला असा आरोप देशमुखांनी बूथ प्रमुखांच्या बैठकीत करून अन्न शिजवायचे आम्ही आणि ताटात मात्र दुसर्‍याच्याच असे सांगत मी पक्षाचे काम करेल, मात्र, कार्यकर्ते यावेळी ऐकतीलच असे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?

दुसर्‍या बाजूला जतमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव होण्यास खासदारच कारणीभूत असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी वारंवार केला असून त्याची दखल पक्षाने कधीच घेतली नाही. उमेदवार चाचपणी वेळी आलेल्या समितीपुढे विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यास तीव्र विरोध दर्शवला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व काँग्रेसचे नेते डॉ. विश्‍वजित कदम तडजोडीचे राजकारण असल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणीही पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे, अरविंद तांबवेकर, नितीन पाटील आदींनी केली. पक्षाकडून या मागणीची गांभीर्याने दखल घेतली नसली तरी संवाद साधण्यास अथवा समजूत काढण्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी टाळले. यामुळेच त्यांनी पक्षाची बंधने तोडून विशाल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय सोमवारी घेतला.

हेही वाचा – “ध्रुवीकरण हाच नरेंद्र मोदींचा अजेंडा”; भाजपा वास्तवातील प्रश्नांपासून दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

आघाडी सरकारच्या काळात स्व. पतंगराव कदम, आरआर आबा आणि जयंत पाटील हे तीन मंत्री आपल्या मतदारसंघातच विकास निधी जादा नेत असल्याचा आणि सिंचन योजनांचे पाणी पळवत असल्याचा आरोप करीत दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी आघाडी अंतर्गत दुष्काळी फोरम तयार करण्यात आला होता. यामध्ये जगताप, देशमुख यांच्यासह अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख आणि विद्यमान खासदार पाटील या पाच पांडवांचा समावेश होता. या माध्यमातून दबाव गट निर्माण करण्यात आला होता. या दबाव गटाला विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीचा हात देत आपला गट प्रबळ करण्याचा प्रयत्न केला. यातूनच भाजपला संजयकाका पाटील यांचे तयार नेतृत्व खासदारकीसाठी लाभले. आता दुष्काळी फोरमच्या नेत्याकडूनच खासदारांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. सध्या तरी हा विरोध अद्याप संघटित झाला आहे असे म्हणता येत नसला तरी पक्षांतर्गत विरोधाला तोंड फुटले आहे हे मान्यच करावे लागेल. हा विरोध संघटित होऊन विरोधात गेला तर याचा निश्‍चितच फटका भाजपला बसू शकतो. यासाठी सांधेजोड करत असताना रूसवे फुगवे काढण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून होतो का हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.