अयोध्येमध्ये तयार होत असलेल्या राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे. मंदिराच्या उदघाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या संघटनांची जोरदार तयारी सुरू आहे. देशातील ४५ प्रादेशिक प्रांतात संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन अक्षता वाटणार आहेत. २२ जानेवारी रोजी लोकांनी स्थानिक मंदिराजवळ जमून अयोध्येतील राम मंदिर उदघाटनाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रत्येक प्रातांत समन्वय बैठक घेतली. या बैठकीला भाजपासह संघाशी निगडित असलेल्या इतर संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. नुकतेच काशी, अवध, ब्रज, मेरठ प्रांत आणि उत्तराखंड प्रांतात अशा प्रकारच्या बैठका पार पडल्या.

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी २९ ऑक्टोबर रोजी वाराणसीमधील काशी प्रांत येथे बैठक घेतली. याप्रमाणेच ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी लखनऊमधील अवध प्रांतमध्ये मागच्या आठवड्यात बैठक घेतली; तर विहिंपच्या ज्येष्ठ नेत्यांनी उत्तराखंड येथे व्हर्च्युअली बैठक घेऊन मार्गदर्शन केले. “उत्तराखंड हा डोंगराळ प्रदेश आहे आणि या ठिकाणी काही महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्येतील पूजेचे थेट प्रक्षेपण मंदिराजवळ दाखविणे, मंदिराजवळ पूजेचे आयोजन करणे आणि अक्षता वाटण्यासाठी आम्हाला जवळपास एक हजार कार्यकर्त्यांची गरज लागू शकते”, अशी प्रतिक्रिया देहरादूनमधील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

हे वाचा >> १८०० कोटींचा खर्च, १६१ फूट उंची, भव्य गाभारा; असं असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर!

“प्रत्येक प्रांताला पाच किलो अक्षता देण्यात येतील. रामजन्मभूमी येथून प्रत्येक प्रांताच्या मुख्यालयाकडे या अक्षता पाठविण्यात येतील. रामजन्मभूमीमधून आणलेल्या अक्षतांमध्ये प्रांतातील पदाधिकारी आणखी अक्षता टाकू शकतात. डिसेंबरच्या अखेरपर्यंत भारतातील प्रत्येक गावात, प्रभागात अक्षता पोहोचतील असे नियोजन करायचे आहे. १ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान घरोघरी जाऊन अक्षता वाटण्यात येतील. पाच कोटी लोकांनी आपल्या घरासमोर दिवा लावावा असेही नियोजन आम्ही करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया मंदिर ट्रस्टच्या एका सदस्याने दिली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच लाख भाविकांना मंदिरासमोर जमवून अयोध्येच्या उदघाटन सोहळ्यात सामील करून घेतले जाईल, असेही या सदस्याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. चार हजार साधू आणि २,५०० विशेष पाहुणे म्हणून काही नागरिकांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यानंतर संघाशी संबंधित अनेक संस्थांचे कार्यकर्ते राम मंदिराला भेट देतील. काशी प्रांतामधील जवळपास २५ हजार स्वयंसेवक ३० जानेवारीपर्यंत राम मंदिराला भेट देणार आहेत.

आणखी वाचा >> ‘राजीव गांधी यांनी बाबरीचे कुलूप उघडले होते’, राम मंदिराच्या श्रेयाबाबत कमलनाथ यांनी भाजपाला सुनावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर अयोध्येतील भाजपा नेत्यांना सेवा कार्य करण्याचे काम सोपविले गेले आहे. एका नेत्याने सांगितले, “१ जानेवारीपासून मोफत अन्नछत्र चालविण्यासाठी आम्ही संस्थेची यादी तयार केली आहे. पक्षाचा वैद्यकीय विभाग डॉक्टरांची यादी तयार करत आहे. भाविक आणि स्वयंसेवकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत.”