कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागल्यानंतर कर्नाटक भाजपा संघटनेत मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून पक्षात आतापासूनच उघड वाद होऊ लागले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि उत्तर बंगळुरुचे खासदार डीव्ही सदानंद गौडा यांनी आरोप केला आहे की, पक्षातील काही नेते त्यांचे तिकीट कापण्यासाठी षडयंत्र आखत आहेत. मागच्या सोमवारी, हेवरी-गडाग येथून तीन टर्म खासदार राहिलेले शिवकुमार उदासी यांनी वैयक्तिक कारणांसाठी राजकीय निवृत्ती जाहीर केली. मी पुढीलवर्षी होणारी निवडणूक लढविणार नाही, अशी माहिती राज्यातील पक्षाच्या नेत्यांना दिली आहे, अशी प्रतिक्रिया उदासी यांनी दिली होती. कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि दक्षिण कन्नडमधून तीन टर्म खासदार राहिलेले नलीन कुमार कतील, माजी केंद्रीय मंत्री आणि सहा टर्म खासदार राहिलेले उत्तर कन्नड अनंतकुमार हेगडे यापैकी एका खासदाराला पक्ष तिकीट नाकारू शकतो. तसेच काही दिवसांपूर्वी तुमकूरचे खासदार जीएस बसवराज यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये ते सांगत होते की, वय वाढल्यामुळे ते पुढील निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यांच्याजागी माजी मंत्री व्ही. सोमन्ना निवडणूक लढवतील. हे वाचा >> Karnataka results : समाजवाद रुजलेल्या कर्नाटकात हिंदुत्ववाद पेरणे महागात पडले? विधानसभा निकालाने काय साधले? मंगळवारी सदानंद गौडा यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर टीका केली. भाजपाकडून विद्यमान २५ खासदारांपैकी १३ खासदारांना पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी तिकीट मिळणार नाही, अशी बातमी काही माध्यमांनी दिली होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले होते, २८ जागांपैकी २५ ठिकाणी भाजपाने विजय मिळविला. काँग्रेस आणि जेडीएस पक्षाला प्रत्येकी एकच जागा मिळवता आली तर अपक्ष सुमलता अबंरीश यांना मांड्या लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाला होता. गौडा पत्रकार परिषदेत म्हणाले, "काही लोक विद्यमान खासदारांचे जाणूनबुजून चारित्र्यहनन करत आहेत. ते लोक कोण आहेत? माध्यमे याच्या बातम्या का देत आहेत? माध्यमांनी पक्षाचे प्रवक्तेपद घेतले आहे का?" सदानंद गौडा यांचे तिकीट कापले जाणार अशी बातमी आल्यानंतर त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन या बातम्यांवर टीका केली. हे पहा >> Photos: “कितना मजा आ रहा है…” काँग्रेसच्या बाजूने निकाल झुकताच इंटरनेटवर मिम्सचा पाऊस उदासी यांनी अपमानाच्या भीतीने त्यांची निवृत्ती जाहीर केली असावी. कुटील डाव रचणाऱ्यांना वाटत आहे की, बाकीचे खासदारही हाच मार्ग निवडतील. मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही पळपुटे नाहीत. पक्षाला संपविण्यासाठी किंवा खासदारांना अपमानित करण्यासाठी कुणीतरी हे षडयंत्र रचत असल्याचेही गौडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढे येऊन हा संभ्रम दूर केला पाहीजे, अशीही मागणी त्यांनी केली. उदासी यांचे स्तुती करताना गौडा म्हणाले की, उदासी एक प्रभावी संसदपटू आहेत. जर ते सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असतील तर मग तुम्ही विचार करा की त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. दरम्यान, भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना विनंती केली आहे की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कतील यांना दक्षिण कन्नड येथून उमेदवारी देऊ नये. बरेच कार्यकर्ते त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत किनारपट्टीच्या भागात भाजपाला चांगले यश मिळालेले आहे. कतिल हे याच भागाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र त्यांच्यावर उमेदवारांची निवड करत असताना भेदभाव केल्याचा आरोप मात्र ठेवण्यात आलेला आहे. पुत्तूर विधानसभा मतदारसंघात एका लोकप्रिय हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्याला तिकीट नाकारण्यात आल्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण आहे. खासदार अनंतकुमार हेगडे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे राजकारणात सक्रीय राहता येत नाही, गेले काही दिवस ते सार्वजनिक राजकारणापासूनही दूर राहत आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देत असताना सोमन्ना म्हणाले की, ते लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक नाहीत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी वरुणा आणि चामराजनगर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली, पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. काँग्रेसने यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव केला. भाजपाला केवळ ६६ जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसने मात्र २२४ पैकी १३५ जागांवर विजय संपादन करून बहुमताने सरकार स्थापन केले.