Who Will be Next CM of Bihar : बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. यादरम्यान बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून अनेक कयास बांधले जात आहेत. बिहारमध्ये पुन्हा एनडीएचा विजय झाल्यास मुख्यमंत्री भाजपाचाच होईल आणि नितीश कुमार यांना दिल्लीत पाठवले जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ‘न्यूज १८’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. इतकेच नाही तर बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला किती जागा मिळणार याचा आकडाही त्यांनी सांगितला. नेमके काय म्हणाले सम्राट चौधरी? जाणून घेऊ…

गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे अपयश आले. दशकभरापासून केंद्रात एकहाती सत्ता राखणाऱ्या पक्षाला या निवडणुकीत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. पण, त्यानंतर महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभा निवडणूक जिंकून भाजपाने जोरदार पुनरागमन केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सत्तेतून बाजूला सारून भाजपाने तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत स्वबळावर सरकार स्थापन केले. यानंतर बिहारमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपाला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत.

बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार – सम्राट चौधरी

“राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरेल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल. मला खात्री आहे की, राज्यात पुन्हा ‘डबल इंजिन’ (केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे/आघाडीचे सरकार) सरकार स्थापन होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ‘न्यूज १८’ ला दिलेल्या मुलाखतीत केला. “गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. महिलांसाठी कल्याणकारी योजना आणल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटींहून अधिक महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. आता आम्ही जनतेमध्ये जाऊन एनडीएला पुन्हा सत्तेवर आणण्याचे आवाहन करू”, असेही सम्राट चौधरी म्हणाले.

आणखी वाचा : भाजपाच्या ‘मिशन बिहार’ला निवडणुकीपूर्वीच धक्का? दोन मित्रपक्ष साथ सोडणार असल्याची चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण!

बिहारमध्ये एनडीएला २०० हून अधिक जागा मिळणार – सम्राट चौधरी

यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला किती जागा मिळणार? असा प्रश्न यावेळी सम्राट चौधरी यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “बिहारमध्ये विकास विरुद्ध विनाश अशी लढत होणार आहे. एका बाजूला विकासाचा विचार करणाऱ्या पक्षांची आघाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला विनाशाचा अजेंडा राबणारी विरोधकांची महाआघाडी आहे. मात्र, या निवडणुकीत बिहारमधील जनता विरोधकांना पुन्हा त्यांची जागा दाखवून देईन. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २०० पेक्षाही अधिक जागा मिळतील”, असा दावा सम्राट चौधरी यांनी केला. भाजपा स्वबळावर १०० हून अधिक जागा जिंकणार असेही ते म्हणाले.

बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण?

गेल्या ११ वर्षांत भाजपाने उत्तर भारतात चांगले बस्तान बसविले असले तरी दिल्लीने भाजपाला आतापर्यंत हुलकावणी दिली होती. यंदा दिल्ली विधानसभेतील विजयाने पक्षाच्या विजयाचं वर्तुळ पूर्ण झाले आहे. मात्र, असे असले तरी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे भाजपाचे स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता अनेकांना आहे. बिहारचे मुख्यमंत्रिपद भाजपाला मिळाल्यास त्यांचे उत्तर भारतातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण होईल. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश मिळाल्यास बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न सम्राट चौधरी यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नितीश कुमार हेच बिहारचे पुढील मुख्यमंत्री होतील, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून जाणीपूर्वक मुख्यमंत्रिपदाबाबत संभ्रम पसरवला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा : RSS ने मुस्लिमांचं संरक्षण करावं, उर्दू वृत्तपत्राची भूमिका; मोहन भागवतांना काय दिला सल्ला?

जागावाटपावरून भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये धुसफूस?

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षात धुसफूस होत असल्याची चर्चा रंगली आहे. लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. त्यासंदर्भात सम्राट चौधरी यांना प्रश्न विचारण्यात आला असता, “एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मित्रपक्षांबरोबरही चर्चा सुरू असून आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहोत. पुढील दोन दिवसांत जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाईल”, असे सम्राट चौधरी यांनी स्पष्ट केले. विरोधकांवर टीका करताना महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अजून ठरला नाही. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार घोषित करण्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.