सांगली : भाजपच्या चिन्हावर महापालिका निवडणूक लढविण्यास जे माजी नगरसेवक आहेत त्यांना भाजप पुन्हा उमेदवारी देण्यास तयार आहे. अगोदर भाजपचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर जागा उरल्या तरच महायुतीतील घटक पक्षांसाठी जागा दिल्या जातील असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
भाजपमध्ये सध्या जे माजी नगरसेवक आहेत त्यांना तर उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत भाजप प्रवेशाच्या मानसिकतेत असलेल्यांनाही उमेदवारीचा शब्द दिल्याने गेल्या दोन अडीच वर्षापासून भाजपमध्ये राहून जे निवडणुकीची तयारी करत होते, त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची तर कोंडी झालीच आहे, याचबरोबर महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) गटाचीही राजकीय कोंडी झाली आहे.
गेल्या आठवड्यात मंत्री पाटील यांनी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कुपवाडच्या गजानन मगदूम यांनी पक्ष प्रवेश केला. दोन वर्षापुर्वी ते भाजपमध्ये होते, की काँग्रेसमध्ये हे शोधायला हवे. त्यांनी गतनिवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा देत असताना विकास कामाच्या माध्यमातून निधीही मोठा मिळवला. आता त्यांनी थेट कमळ हाती घेतले आहे. त्यांच्या स्वागतावेळी मंत्री पाटील यांनी भाजपची महापालिका निवडणुकीतील संभाव्य रणनीती स्पष्ट केली.
गेल्या वेळी मतदारांनी भाजपच्या हाती सत्ता दिली होती. मात्र, दिलेली सत्ता धड पाच वर्षेही टिकवता आली नाही. भाजपमधीलच काही नाराज नगरसेवकांना सोबत घेउन राष्ट्रवादी-काँग्रेसने महापौर पदाची निवडणूक जिंकत सत्ता हस्तगत केली. यामुळे महापौर, उपमहापौर काँग्रेसकडे आणि स्थायी सभापती, सभागृह नेते पद भाजपकडे तर विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होते. यामुळे विरोधक कोण आणि सत्तेत कोण अशी स्थिती महापालिकेत पाहण्यास मिळाली. आता या खुर्चीच्या खेळाला जनताही कंटाळली आहे. गेल्या अडीच वर्षाचा कारभार तर प्रशासकांच्या हाती आहे. यामुळे शहरातील दिवाबत्ती, पाणी पुरवठा आरोग्य या समस्यांचा निपटाराच होत नाही. अधिकारी तर आपली पत आणि प्रतिष्ठा सांभाळण्याच्या नादात, जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणारे लोकप्रतिनिधीच सभागृहात नसल्याने सगळाच गोंधळ आहे. अशा स्थितीत भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्याची स्वप्ने तेही आयात म्हणजेच तयार नेतृत्वाच्या भरवशावर.
चंद्रकांतदादांनी माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याचे सूतोवाच करत असताना गेल्या सात वर्षापासून म्हणजे मागील निवडणुक झाल्यापासून नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे मग काय होणार, की ते पर्याय शोधणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपसोबत सध्या जनसुराज्य शक्तीचे समित कदम तन-मनाने आहेत. त्यांच्या पक्षाचाही विस्तार होत आहे. त्यांच्या पक्षानेही मिरजेत आमदार विनय कोरे, आमदार अशोक माने यांच्या उपस्थितीत मेळावा घेउन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासाठी महायुतीत स्थान काय असणार? उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती जागा देणार हा प्रश्नच आता गौण ठरू पाहतो आहे. राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांना पक्षाने राज्यस्तरावर नेतृत्वाची संधी दिली. मात्र, ते अद्याप महापालिकेच्या बाहेर पडायला तयार नाहीत. तर भाजपचे नेते सुरेश आवटी आपल्या मुलासाठी भाजपच्या वळचणीला आज जरी दिसत असले तरी त्यांनी पर्याय म्हणून राजकीय दबावासाठी स्वतंत्र पक्षाची नोंदणी केली आहे. यामुळे महापालिका निवडणुकीत पक्ष म्हणून भाजप एकजिनसीपणा दाखवणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
