सांगली : आम्ही वाघ आहोत, ईर्षेने आता पेटलोय, साम, दाम, दंड वापरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक जिंकूच असे काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी सांगितले. सांगण्यासाठी मुहुर्त शोधला तो वडिलांचे म्हणजेच डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्तीचा. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ घटले, कदमांचे मताधिक्य घटले, अनेक काँग्रेसचे स्थानिक नेते भाजप वासिय झाले. तरीही काँग्रेसचे ढासळते घर सावरण्यासाठी स्थळही शोधले ते सोनहिरा व म्हणजेच आपले अंगणातीलच. गेले वर्षभर काँग्रेसला गळती लागली आहे. जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक राहते की नाही अशी स्थिती असताना डॉ. कदम आता ईर्षेने पेटले आहेत. म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशीच अवस्था पक्षाबरोबरच पक्ष नेतृत्वाची असेच म्हणावे लागेल.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या लोकतीर्थाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते या वेळी उपस्थित राहिले नाहीत. विधानसभेतील माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या निमित्ताने मतदार संघातील कार्यकर्त्यांना माती घेउन येण्याचे आवाहन करून या मातीत वृक्षारोपण करण्याचा संकल्प सोडण्यात आला. लोकांनी माती आणली, मात्र, जाताना जोशपुर्ण आवेग लक्षात राहिला असला तरी थोरल्या साहेबांची नाळ जशी सर्वसामान्यांशी जुळली होती, तशी अद्याप धाकल्या साहेबांशी फारशी जुळलेली दिसली नाही.

लोकसभा निवडण्ाुकीवेळी महाविकास आघाडीत बंड करून विशाल पाटील यांना खासदार केले. लोकसभेतील शंभरावे खासदार म्हणून काँग्रेसचे सहसदस्यत्व मिळवून दिले. लोकसभेत ते चांगले बोलतात, विविध विषय हाताळत असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना जी ताकद द्यावी लागते ती ताकद मात्र अद्याप काही दिसत नाही. या उलट भाजपचे नेतृत्व सर्व प्रकारची ताकद वापरून आपला पक्ष विस्तार करत आहे. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा, खासदारांच्या वहिनी जयश्री पाटील यांना भाजपमध्ये घेतले, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही काँग्रेसचा त्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला. तरीही अजून डॉ. कदम आणि खासदार यांना लोकसभेवेळी मिळालेले मताधिक्य आपणामुळेच असे वाटत असेल तर शहामृगासारखीच स्थिती आहे. शत्रू समोर आल्यानंतर वाळूत तोंड खपसून शत्रू गायब झाल्याची कल्पना करण्यातील हा प्रकार म्हणावा लागेल.

ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ते जिल्हा पातळीवर कोणताही कार्यक्रम त्यांनी घेतल्याचे दिसत नाही. खासदार केवळ कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठीभेटी घेतात. अन्य वेळी दिल्ली, मुंबई वार्‍या सुरू असतात. महापालिका निवडणुका तोंडावर आल्यानंतर आमदार, खासदारांनी एकत्र गणेश मंडळांना भेटी देउन आपण तत्पर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील यांच्याशी सूर जुळणार का हा खरा प्रश्‍न आहे. सूर जुळले तर जागा वाटपाचा तिढा आहेच. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे काय करणार हाही प्रश्‍न आहेच. महापालिका, जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी केवळ पेटून उठून आणि साम, दाम, दंड या नीतीचा अवलंब करून मिळणार असेल तर भाजप त्यामध्येही पुढे आहे. हे महाविकास आघाडीची सत्ता गेली त्यावेळीच दिसून आले आहे. याला कसा छेद देणार हा महत्वाचे आव्हान आहे.