सांगली : सांगलीच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात वाद सुरू असताना आघाडीतच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे मौन अचंबित करणारे आणि संशय निर्माण करणारे ठरत आहे. ‘मौनम्, सर्वार्थ साधनम्’ या त्यांच्या भूमिकेमुळे आघाडीमध्ये दोस्तीत कुस्ती होण्याची वेळ आली असताना त्यांचे मौनच या परिस्थितीला कारणीभूत नाही ना असा संशय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. आघाडी सरकारच्या काळात १५ वर्षे घरोबा, मैत्री असतानाही आपल्या मित्रपक्षाची होत असलेली राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्नही करावासा का वाटत नसावा यामागे दादा-बापू हा ऐतिहासिक वाद तर नाही ना, असाही पदर यामागे आहे.

सांगली लोकसभेसाठी मविआमधील ठाकरे शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मुळात शिवसेनेची ताकदच कमी आहे. एकसंघ शिवसेना असताना खानापूर-आटपाडीमधून अनिल बाबर हे सेनेचे आमदार म्हणून विजयी झाले, मात्र, यामागे पक्षाची ताकद नगण्यच होती. ही एक राजकीय सोय म्हणून बाबर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ पक्षातून बाहेर पडताच त्यांना साथ देणाऱ्या आमदारामध्ये बाबरांचा समावेश होता. यामुळे उरल्या, सुरल्या शिवसेनेची स्थिती आठशे दारे, नउशे खिडक्या अशी झाली. तरीही ठाकरे शिवसेनेने सांगलीच्या जागेचा आग्रह धरला. आग्रह धरणे जागा पदरात पाडून घेणे यात वावगे काही नाही, मात्र, भाजपला पराभूत करणे या लक्ष्याला बगल देउन केवळ हट्टवादी भूमिका घेणे काहींसे अतिरंजीत तर वाटतेच मात्र, कोणत्याही स्थितीत सांगलीच्या जागेचा आग्रह सोडायचाच नाही, आम्ही वाटेल ती मदत करतो असा शब्द कोणी तरी दिला असावा अशी शंकास्पद स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

हेही वाचा : शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली

शिवसेनेने उमेदवारी दिलेले पैलवान पाटील २००७ मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी भाळवणी (ता.विटा) गटातून प्रस्थापित असलेल्या काँग्रेसच्या रामराव पाटील यांना पराभूत केले होते. त्यावेळी राष्ट्रवादीची ती गरज होती. यामुळेच बाबर, आरआर आबा आणि जयंत पाटील यांनी राजकीय खेळीसाठी पैलवानांचा वापर केला होता. त्यामुळे आजही तीच खेळी तर खेळली जात नसेल ना अशी शंका येत आहे. कारण पैलवान पाटील मैदानात उतरण्यासाठी गेली दोन वर्षे जाणीवपूर्वक प्रयत्नशील आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी आमदार पाटील यांच्याकडे प्रयत्न केले होते. तिथे उमेदवारी मिळणार नाही असे दिसताच त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेही प्रयत्न केले. आणि १५ दिवसापुर्वी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधण्यापुर्वीच उमेदवारीचा शब्दही घेतला. दिलेला शब्द उध्दव ठाकरे यांनी मिरजेतील मेळाव्यात खराही करून दाखवला.

हेही वाचा : नगरमध्ये सुजय विखे यांना निलेश लंके यांचे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत सांगलीच्या जागेवरील हक्क सोडायचाच नाही अशी भूमिका घेत प्रसंगी दोस्तीत कुस्ती म्हणजेच मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असतील यात शंका नाही.वसंतदादा घराण्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व जाऊ नये यासाठी गेल्या तीन दशकापासून आमदार जयंत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.या प्रयत्नातूनच जिल्हा बँक, बाजार समिती, महापालिका निवडणुकीत प्रसंगी भाजपला सोबत घेतले. महापालिकेत भाजपचे बहुमत असताना राष्ट्रवादीचा महापौर करून सत्ता हिसकावत असताना काँग्रेसला दुय्यम स्थान दिले गेले. संख्याबळ अधिक असतानाही ही तडजोड काँग्रेसने स्वीकारली. लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या तुल्यबळ किंबहुना जास्तीची ताकद काँग्रेसची आहे. हे ज्ञात असतानाही शिवसेनेच्या जागेच्या हट्टाबाबत आमदार पाटील काहीच बोलण्यास तयार नाहीत. यामागे दादा-बापू हा वाद असावा. कोणत्याही स्थितीत दादा घराण्यातील नेतृत्व राजकीय पटलावर पुढे येउ नये यासाठी केेलेली ही खेळी असावी. काट्याने काटा काढण्याची पध्दत असली तरी आज अंगणात पेटलेली काडी पुढे वणवा होउन घराला घेरू लागली तर काय होईल?