Premium

सांगलीच्या आखाड्यात खडाखडी सुरू

सांगलीच्या मैदानात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे विशालदादा पाटील यांच्यात खडाखडी सुरू झाली आहे.

Sanjaykaka Patil and Vishaldada Patil of Congress
भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे विशालदादा पाटील

दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : गेले आठ दिवस ढग येतात, गडगडाट होतो, वीजा चमकतात. मात्र, या तुलनेत ओढे-ओघळी दुथडी भरून वाहू लागतील असा पाउसच झालेला नाही. अस्वलाच्या अगोदर जसा दरवेशांचा दंगा असतो, तीच गत यंदाच्या वळवाची झाली आहे. अगदी हेच वर्णन सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले असून उमेदवारीचे अजून निश्‍चित नसताना सांगलीच्या मैदानात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे विशालदादा पाटील यांच्यात खडाखडी सुरू झाली आहे.

आजपर्यंत विधानसभा की लोकसभा या द्बिधा मनस्थितीत असणार्‍या विशाल पाटलांनी लोकसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी असल्याचे काँग्रेसच्या बैठकीत जाहीर केले, आणि भाजपचे खा. पाटील यांनी मी जत्रा आल्यावर तालमीत  जाणारा मल्ल नसून नित्य  जोर बैठका काढणारा पैलवान असल्याचे सांगत आव्हान दिले आहे. वारस की सरस या मुद्द्यावर २०१४ मधील लोकसभा निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहर्‍यावर खा. पाटील यांनी लढवली आणि ज्या भाजपला अस्पर्श समजले जात होते, त्या भाजपने सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त केला. याला वसंतदादा घराण्यात असलेला अतिआत्मविश्‍वास जसा कारणीभूत

ठरला, तसाच  दादा घराण्यातील तिसर्‍या पिढीचा जनतेशी तुटलेला  संपर्कही कारणीभूत ठरला होता. राहूल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमध्ये असून केंद्रात राज्यमंत्री पद असूनही या घराण्याला आपला पराभव टाळता आला नाही. मागील निवडणुकीत प्रतिक पाटील यांचा निवडणुक मैदानात उतरण्यापुर्वीच मानसिक पराभव झाला होता. यातून उमेदवारीही गमावली. अखेर अंतिम  क्षणी सगळेच हातातून जाण्याची प्रसंग आला त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर उतरून विशाल पाटील यांनी मैदानात उडी मारली. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आणि संजयकाका  यांना दुसर्‍यांचा दिल्लीचा दरवाजा उघडला.

मात्र, विशाल पाटील यांचे प्रथम प्राधान्य आमदारकीला होते. या कचखाउ भूमिकेमुळेच त्यांना धड लोकसभा मिळाली, ना विधानसभा. दुसर्‍या बाजूला भाजपच्या दरवाजाची कडीही वाजवली. मात्र,घरात एवढी गर्दी झालेली आहे, की नवागत पाहुण्याचा आदरसत्कार करण्यासाठी काय द्यायचे? हा प्रश्‍नच होता. विधानसभा की, लोकसभा या द्बिधा मनस्थितीत जिल्हा धरायचा की सांगली विधानसभा पुरतेच पाहायचे याचा विचार होत नव्हता.

मात्र, आता राष्ट्रवादीने सांगलीवर हक्क सांगायला सुरूवात केल्यानंतर आता हातचे सगळेच जाण्याची वेळ आल्याची जाणीव झाली. आ. जयंत पाटील यांनी कार्यकर्ते सांगली लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आग्रह धरत असल्याचे सांगितल्याने सगळेच हातातून निसटण्याचा मोठा धोका समोर दिसू लागला. दादा घराण्याची राजकीय कोंडी होण्याची भीतीतूनच लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर करीत पक्षाला दिलासा देत असताना स्व:ताच्या उरल्या सुरल्या गटालाही जिवंत ठेवण्याचे काम दादांच्या वारसदारांनी केले आहे. त्यात महाविकास आघाडी एकसंघपणे लढली तर एकहाती विजय संपादन होउ शकतो, याची प्रचिती सांगली बाजार समितीच्या निवडणुकीने दिली आहे.

भाजपने अद्याप उमेदवारी कोणाला मिळणार हे जाहीर केलेले नसले तरी पक्षिय पातळीवर जोरबैठका सुरू केल्या आहेत. विद्यमान खा.पाटील तिसर्‍यांदा लोकसभेवर जाण्यासाठी तयार आहेत, मात्र, पक्षांतर्गत विरोधही गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही तीव्र होत आहे. जतमध्ये जगताप, आटपाडीमधून पडळकर, विट्यातून बाबर, पलूस-कडेगावमधून देशमुख कवठेमहांकाळमधून घोरपडे यांचे खासदारांशी फारसे सख्य सध्या तरी नाही. मात्र, जनसंपर्क आणि सामान्यामध्ये मिसळण्याची कला ही खा. पाटलांची जमेची बाजू आहे. या जोरावर पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. खासदारकीसाठी दोन्ही पाटलांना समोरच्या राजकीय विरोधकांशी  दोन हात करण्यापुर्वी पक्षातंर्गत व आघाडी अंतर्गत असलेल्या विरोधकांवर मात करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 15:32 IST
Next Story
समाजाच्या पाठबळामुळेच पंकजा मुंडे यांच्या सततच्या इशाऱ्याकडे भाजपचे दुर्लक्ष