Sardar Vallabhbhai Patel AI Holobox : सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा सल्ला का दिला होता? नेहरूंच्या जागी ते पंतप्रधान असते तर त्यांनी काय निर्णय घेतले असते? महात्मा गांधी यांच्याबरोबर पटेल यांचे संबंध कसे होते? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देशवासियांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे ही उत्तरे स्वत: सरदार पटेल यांच्याकडूनच दिली जात आहेत. नवी दिल्लीतील तीन मूर्ती भवन परिसरातल्या ऐतिहासिक पंतप्रधान संग्रहालयात ही उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे या संग्रहालयात अनेकजण भेट देत असल्याचे दिसून येत आहे, पण हे नेमके कसे घडले? सरदार पटेल नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे कसे देत आहेत, त्यासंदर्भातील हा आढावा…

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा एआय आधारित होलोबॉक्स पंतप्रधान संग्रहालयात व ग्रंथालयात उभारण्यात आला आहे. धोतर-कुर्ता आणि जॅकेट परिधान करून खांद्यावर शाल घेतलेले पटेल संग्रहालयात अगदी थाटात उभे आहेत. या होलोबॉक्समध्ये पटेल यांची अधिकृत ध्वनीफिती, छायाचित्रे आणि व्हिडीओंचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे अभ्यागतांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पटेल यांच्या मूळ आवाजातच ऐकायला मिळतात. एकेकाळी ‘नेहरू मेमोरियल संग्रहालय आणि ग्रंथालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचा नरेंद्र मोदी सरकारच्या काळात विस्तार करण्यात आला आहे. आता त्यात देशाचे सर्व पंतप्रधान आणि त्यांचे योगदान समाविष्ट करण्यात आले आहे. या संग्रहालयात सरदार पटेलांना विशेष स्थान देण्यात आले आहे.

प्रश्न : तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी का घातली होती?

सरदार पटेल यांचा होलोबॉक्स सांगतो, “महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला संबंध असल्याचा दावा केल्यानंतरच आरएसएसवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. गांधींच्या हत्येमागचे सत्य शोधण्याच्या स्पष्ट हेतूने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सखोल चौकशी केल्यानंतर असे निष्कर्ष निघाले की, या हत्येच्या कटात संघाचा कुठलाही संबंध नव्हता. त्यावेळी मी तत्कालीन सरसंघचालक एम. एस. गोळवलकर गुरुजी यांच्याबरोबर चर्चा केली. संविधानाच्या चौकटीत राहूनच संघ आपले काम करेल याची हमी त्यांच्याकडून घेतल्यानंतर जुलै १९४९ मध्ये आरएसएसवरची बंदी उठवण्यात आली.”

आणखी वाचा : Visual Storytelling : महायुती सरकारची चोहोबाजूने कोंडी, कारण काय? राज्यात नेमकं काय घडतंय?

भाजपाचा प्रयत्न हास्यास्पद, काँग्रेसची टीका

फाळणीनंतर देशाचे ‘एकीकरण’ करणारे नेते म्हणून सध्याचे भाजपा सरकार सरदार पटेल यांना आपले आदर्श मानते. भाजपाने पटेल यांच्यावर हक्क सांगण्याच्या प्रयत्नांवर काँग्रेसने नेहमीच आक्षेप घेतला आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतील भाजपाने कोणतीही भूमिका बजावली नाही. त्यांच्याकडून नेहमीच सत्य मिटवण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप काँग्रेसचे नेते करतात. “सरदार पटेल यांची विचारसरणी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध होती, त्यामुळे त्यांच्या वारशावर हक्क सांगण्याचा भाजपाचा प्रयत्न हास्यास्पद आहे”, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे एप्रिलमध्ये म्हणाले होते.

प्रश्न : नेहरूंच्या जागी तुम्ही देशाचे पंतप्रधान असता तर काय केले असते?

नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर त्यांनी अनेक गोष्टी अधिकच चांगल्या पद्धतीने हाताळल्या असत्या, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसह उजव्या विचारसणीच्या लोकांची धारण आहे. या प्रश्नावर होलोबॉक्स अतिशय सावधपणे उत्तर देतो. “राष्ट्रीय एकता सुनिश्चित करण्यावर आणि विविध समुदायांचे एकत्रीकरण करण्यावर माझा भर राहिला असता. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि सामान्य माणसाला सक्षम करण्यासाठी मी कृषी आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य दिले असते,” असे पटेल सांगतात.

गृहमंत्री म्हणून देशातील संस्थानांच्या एकीकरणात पटेल यांनी घेतलेल्या पुढाकारावर प्रश्न विचारल्यावर होलोबॉक्स त्याचे थोडेफार श्रेय नेहरूंना देतो. “बहुतेक संस्थानांनी अखंड भारतामध्ये सामील होण्याचा लाभ समजून घेतला होता. संवाद, मनधरणी आणि समजूतदारपणाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या चिंता दूर केल्या. या प्रक्रियेत नेहरू सहाय्यक भूमिकेत होते आणि त्यांनी अगदी लहान राज्यांच्या हितांची काळजी घेतली होती”, असे होलोबॉक्स सांगतो.

Sardar Vallabhbhai Patel holobox
सरदार पटेल यांचा पंतप्रधान संग्रहालयात उभारलेला होलोबॉक्स

प्रश्न : महात्मा गांधी यांच्याबरोबरचे तुमचे संबंध कसे होते?

महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंना पसंती दिली होती असे मानले जाते. त्यावर गांधींबरोबरचे तुमचे संबंध कसे होते असा प्रश्न विचारला असता, “भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही एकत्र काम केल्यामुळे आमचे नाते खूप घट्ट होते. अनेक प्रश्नांवरून आमच्यात थोडेफार मतभेद होते, पण त्यामुळे आमचे संबंध अधिक मजबूत झाले,” असे उत्तर होलोबॉक्स देतो. पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दररोज सुमारे २० अभ्यागत संग्रहालयात येऊन पटेल यांच्या होलोबॉक्सशी संवाद साधतात आणि मायक्रोफोनवर हिंदी किंवा इंग्रजीमध्ये प्रश्न विचारतात. या होलोबॉक्सबद्दल अधिक लोकांना माहिती मिळाल्यावर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दररोज एक हजारहून अधिक लोक संग्रहालयाला भेट देत असून आठवड्याच्या शेवटी ही संख्या वाढत आहे.

हेही वाचा : What is Zoho : मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर देणारा ‘झोहो’ हा स्वदेशी प्लॅटफॉर्म नक्की आहे तरी काय?

सरदार पटेल यांचा होलोबॉक्स कुणी तयार केला?

सरदार पटेल यांचा हा ‘होलोबॉक्स’ गुरुग्राममधील Vizara Technologies या कंपनीने तयार केला आहे. या होलोबॉक्सला एखादा प्रश्न विचारल्यानंतर एआय आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध वेबसाईट्स, अभिलेखागार आणि डिजिटल सामग्रीच्या माध्यमातून उत्तर तयार करून पटेल यांच्या आवाजात सादर करते. दरम्यान, या उपक्रमाचा विस्तार करण्याची संग्रहालयाची योजना आहे. पुढील महिन्यापासून संग्रहालयाच्या तळमजल्यावर ‘दूरदृष्टीच्या व्यक्तींसोबत संवाद’ नावाचा एक विभाग सुरू केला जाणार आहे, त्यामध्ये दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा एआय-तंत्रज्ञानावर आधारित असाच होलोबॉक्स तयार केला जाईल.

होलोबॉक्सचे अनावरण १७ सप्टेंबरलाच का करण्यात आले?

सरदार पटेल यांच्या ‘होलोबॉक्सचे अनावरण करण्यासाठी निवडलेल्या १७ सप्टेंबर या तारखेलाही विशेष महत्त्व आहे. १९४८ मध्ये याच दिवशी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाले होते. या संदर्भात १७ सप्टेंबर रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात पटेल यांच्या भूमिकेवर भर दिला गेला. “या घटनेच्या दोन वर्षांनंतर १७ सप्टेंबर १९५० रोजी नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला. ते काही दशकांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेखाली एकता आणि अखंडतेच्या याच भावनेला आणखी बळकट करण्यासाठी समर्पित असलेले नेते म्हणून पुढे आले,” असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या शनिवारी एका अभ्यागताने होलोबॉक्सला विचारले की, आज देशासमोर असलेल्या आव्हानांना तुम्ही कसे सामोरे जाल? त्यावर “मला सध्याच्या आव्हानांची माहिती नाही, परंतु जर मी आजचा नेता असतो तर मी विविध समुदायांमध्ये एकता आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले असते. वैयक्तिक किंवा पक्षीय अजेंडापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले असते,” असे उत्तर सरदार पटेल यांच्या होलोबॉक्सने दिले.