घनसावंगी तालुक्यातील खासगी साखर कारखानदार सतीश घाडगे यांनी अलिकडे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने या भागात आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मागील पाच विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादीचे राजेश टोपे या भागातून निवडून आलेले आहेत.

हेही वाचा- भाजपमध्ये पंकजा मुंडेच्या विरोधात नवनव्या खेळी

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Dissatisfaction in Ashok Chavans sphere of influence due to Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्गामुळे अशोक चव्हाणांच्या प्रभावक्षेत्रात असंतोष, नांदेडमध्ये भाजप उमेदवाराला फटका बसणार?
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व

दोन सहकारी साखर कारखाने अधिपत्याखाली असणारे राजेश टोपे घनसावंगी आणि अंबड तालुक्यांतील महत्त्वाचे नेते आहेत. जायकवाडी लाभक्षेत्राचा मोठा भाग या दोन तालुक्यांत येत असल्याने मागील चार-पाच वर्षांत या भागात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून साखर कारखाने क्षमतेपेक्षा अधिक चालूनही ऊस शिल्लक राहत आहे. सहकारी साखर कारखानदारीमुळे टोपे यांचे महत्त्व या भागात आहे तसेच त्यांचे महत्त्व शिक्षणसंस्थेचे जाळे, सहकारी बँक आणि गावपातळीपर्यंतच्या राजकारणामुळे आहे. घनसावंगी मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचूनही टोपे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांच्याशी कडवा संघर्ष करावा लागला होता. त्यानंतर टोपे अधिक सजग झाले असून गावपातळीवर अधिक संपर्क ठेवण्यावर भर देत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक यश टोपे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळालेले आहे.खासगी समृद्धी कारखान्याचे अध्यक्ष सतीश घाडगे यांच्या अधिपत्याखाली टोपे यांच्याप्रमाणेच दोन साखर कारखाने आहेत. त्यापैकी एक कारखाना घनसावंगी तालुक्यात असून दुसरा औरंगाबाद जिल्ह्यात आहे. घनसावंगी तालुक्यातील साखर कारखान्यामुळे आणि उसाचे क्षेत्र वाढल्याने घाडगे यांचे महत्त्व वाढले आहे. त्यांनी आता भाजपमध्ये केलेला प्रवेश पुढील राजकारणाची नांदी मानली जात आहे. काही ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला सहभाग याचे उदाहरण मानले जाते. मागील तीन-चार महिन्यांत ऊस उत्पादकांशी संपर्क साधण्याच्या निमित्ताने त्यांचा घनसावंगी मतदारसंघात गावपातळीवर संपर्क वाढला आहे.

हेही वाचा- सोलापूर आणि बारामतीच्या पाणी प्रश्नावर भाजपची संदिग्ध भूमिका

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी आमदार विलास खरात या भागातील जुने-जाणते पुढारी असून सध्या ते भाजपमध्ये आहेत. कै. अंकुशराव टोपे आणि नंतर राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्याशी राजकीय संघर्ष करीत खरात दोन वेळेस विधानसभेवर निवडून आले होते. घनसावंगीतून ते पुन्हा भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत का, या विषयी उलट-सुलट तर्क या भागातील राजकीय कार्यकर्ते व्यक्त करीत असतात. अलिकडेच तीर्थपुरी येथे भाजप तालुका अध्यक्षांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पक्षाने उमेदवारी दिल्यास परभणी लोकसभेची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे वक्तव्य खरात यांनी केले. जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी लोकसभा मतदारसंघात होते. आतापर्यंत युतीच्या वाटपामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपऐवजी शिवसेनेकडेच राहिलेला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत आता तेथे भाजपचा उमेदवार असेल, असे गृहीत धरून खरात यांनी तीर्थपुरी येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.सुुरुवातीपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे डॉ. हिकमत उढाण यांनी दोनदा घनसावंगीमधून विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु ते दोन्हीही वेळेस राजेश टोपे यांच्याकडून पराभूत झाले. मतदारसंघातील संपर्क पाहता तिसऱ्यांदा ते शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे कार्यकर्ते सांगतात. परंतु आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणून लढविली गेल्यास राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांचाच दावा या जागेवर राहील हे स्पष्ट आहे. मागील साडेतीन दशकांपेक्षा अधिक काळ (कै.) बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी कायम साथ देत असलेले शिवसेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे गेल्या काही महिन्यांत राजकारणात अधिक सक्रिय झालेले आहे.

हेही वाचा- यावर्षी नऊ राज्यांमध्ये निवडणुका; आम आदमी पार्टी शोधतेय विस्ताराची संधी

घनसावंगी येथे त्यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने आयोजित केलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनास उद्धव ठाकरे यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती होती. हा कार्यक्रम चोथे यांचे शिवसेनेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले महत्त्व अधोरेखित करणारा मानला जात आहे. ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेत असल्याने घनसावंगी विधानसभा मतदारसंघात त्यांचा संपर्क आहे. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षाचे जिल्हाप्रमुखपद त्यांच्याकडे होते आणि शिक्षण संस्थेमुळेही त्यांचा या भागात संपर्क आहे. त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील आगामी राजकारणाच्या अनुषंगाने चोथे यांचे नाव अलिकडच्या काळात अधिक चर्चेत आलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तीन साखर कारखान्यांच्या पट्ट्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपे यांच्याविरुद्ध आगामी उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता मात्र आहे.