Bihar elections 2025 बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. भाजपाने निलंबित केलेल्या अभिनेत्याला पुन्हा पक्षात घेतले आहे. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांची पक्षात पुन्हा ‘घरवापसी’ झाली आहे. मात्र, या भोजपुरी अभिनेत्याची पार्श्वभूमी खूप वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विरोधक पवन सिंह यांच्यावर पुन्हा आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मुख्य म्हणजे पवन सिंह यांच्या पत्नीने माध्यमांसमोर येऊन, त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांमुळे वादंग निर्माण झाला आहे. परंतु, असे असले तरी भाजपा त्यांना तिकीट देण्यावर ठाम आहे. यामागील कारण काय? समजून घेऊयात…
नेत्याभोवतीच्या आरोपांवर भाजपाची भूमिका
२०२४ च्या बंगाल लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या वादामुळे आणि आता बुधवारी पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह यांनी त्यांच्यावर केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांमुळे वादंग निर्माण झाला असतानाही पक्षाचा सिंह यांना बिहारमध्ये उमेदवारी देण्याचा आग्रह भाजपाची नवीन जातीय समीकरणे दर्शवतो. भाजपमधील सूत्रांनुसार, पक्ष त्यांना एका महत्त्वाच्या आणि निर्णायक राजपूत जागेवरून उमेदवारी देणार आहे. ही जागा कदाचित आरा असेल, अशी शक्यता आहे.
प्रसिद्ध गायक, अभिनेता व स्वतःला राजपूत अभिमानाचा पोस्टर बॉय मानणारे सिंह २०२४ मध्ये वादळाच्या केंद्रस्थानी होते. आसनसोलमधून त्यांची उमेदवारी जाहीर होताच, आक्षेपार्ह विधाने, गाण्यांचे बोल आणि काही जुन्या व्हिडीओंमधील कृत्ये पुन्हा समोर आल्याने मोठा संताप निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता भाजपाच्या बिहार युनिटसाठी पवन सिंह केवळ एक सेलिब्रिटी चेहरा नाहीत, तर ते एक राजपूत प्रतीकदेखील आहेत. ते विरोधी पक्षाच्या पारंपरिक उच्च जातीय क्षेत्रात फूट पाडण्याची आणि संपूर्ण राजपूत पट्ट्यात तरुणांना ऊर्जा देण्याची क्षमता ठेवतात.
भाजपाची राजपूत समीकरणे
भोजपूर (आरा), बक्सर, रोहतास, कैमूर, औरंगाबाद व जेहानाबाद या जिल्ह्यांचा समावेश असलेला शहाबाद-मगध पट्टा हा बिहारच्या राजपूत समुदायाचे राजकीय केंद्रस्थान राहिला आहे. राजपूत मतदारांची वाढती संख्या आणि अनेक मतदारसंघांवर त्यांचे ऐतिहासिक वर्चस्व यांमुळे या प्रदेशाचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे.
राजपूत सारण विभागाच्या काही भागांवर, जसे की सिवान आणि महाराजगंजवरही प्रभाव टाकतात; पण त्यांचे राजकीय महत्त्व शहाबाद पट्ट्यात सर्वाधिक आहे. आरा हे राजपूत लोकांचे एक महत्त्वाचे केंद्र असले तरी आणि सिंह स्वतः राजपूत असले तरी एका वरिष्ठ भाजपा नेत्याने सांगितले की, ते दुसऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या राजपूत-प्रबळ जागेसाठी संभाव्य भाजपाचे उमेदवार असतील, जिथे पक्षाला कुशवाह आणि राजपूत मतांमध्ये समतोल राखण्याची गरज आहे.
औरंगाबादमध्ये सूर्यवंशी राजपूत लोकांची संख्या जास्त असल्याने अनेकदा या क्षेत्राला ‘बिहारचा चित्तोडगड’ म्हटले जाते आणि येथे राजपूत नेत्यांना निवडून देण्याची परंपरा आहे. २०१४ मध्ये पवन सिंहच्या अपक्ष उमेदवारीमुळे राष्ट्रीय लक्ष वेधून घेतलेल्या काराकाट जागेने एनडीएच्या जातीय गणितातील, विशेषत: राजपूत आणि कुशवाहा यांच्यातील दरीदेखील उघड केली होती.
भाजपासाठी पवन सिंह यांचे महत्त्व
नुकत्याच झालेल्या वादांनंतरही पवन सिंह यांना भाजपमध्ये पुन्हा समाविष्ट करून घेणे, हा राजपूत आधारस्तंभात सुधारणा करण्याचा पक्षाचा स्पष्ट प्रयत्न आहे. सिंह यांना पुन्हा पक्षात घेऊन, भाजपा २०२५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजपूत मतपेढीचे एकत्रीकरण करण्याचा आणि जातीय आघाडीची पुनर्रचना करण्याचा आपला हेतू दर्शवीत आहे. भाजपाच्या आतील सूत्रांचे म्हणणे आहे की, सिंह यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय हा राजपूत समुदायाला दिलेला एक संकेत आहे. कारण- राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वामध्ये कमी प्रतिनिधित्वामुळे हा समुदाय नाराज आहे. त्यांना पुन्हा सन्मानित करून, पक्ष वादाचे रूपांतर एकत्रीकरणात करण्याची तयारी करीत आहे. जेडी(यू) गोटातील एका वर्गाचा असा विश्वास आहे की, हा निर्णय उलटू शकतो आणि विरोधी पक्षाला एनडीएला संधीसाधू म्हणून चित्र रंगवण्याची संधी देऊ शकतो.
भोजपुरी स्टार पवन सिंह शाहाबाद प्रांतातून येतात, जो बिहारचा ऐतिहासिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. त्याला ‘भोजपूर प्रदेश’ असेही म्हणतात. त्यात भोजपूर, आर्रा, रोहतास, सासाराम, कैमूर-भभुआ व बक्सर या जिल्ह्यांचा समावेश आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत या भागात भाजपाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. येथील एकूण २२ जागांपैकी एनडीएला फक्त आठ जागा जिंकता आल्या होत्या. उर्वरित १४ जागांवर विरोधी पक्षाच्या ‘महागठबंधन’ने विजय मिळवला होता, ज्यामुळे या प्रदेशाची जागा सत्ताधारी आघाडीसाठी खूपच कमकुवत ठरली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही या प्रदेशातील पाचपैकी चार लोकसभा जागा (आरा, काराकाट, औरंगाबाद व सासाराम) एनडीएने गमावल्या. या पराभवासाठी सिंह यांचे निलंबन आणि राजपूत व कुशवाह यांच्यातील उघड संघर्ष कारणीभूत ठरला. सिंह यांचे या प्रदेशातील राजपूतबहुल आरा आणि बरहरा या दोन जागांवर लक्ष आहे. भाजपासाठी सिंह यांना परत आणणे ही एक राजकीय गरज आहे. कारण- त्यांच्या स्टार-पॉवर आणि जातीय समीकरणांच्या माध्यमातून मते एकत्रित करणे पक्षासाठी महत्त्वाचे आहे.