कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणुकीत जागा वाटपाबाबतची भाजपची आग्रही भूमिका महायुतीमध्ये अडसर ठरू शकते. महापौर पदासह ४५ जागांवर दावा करणाऱ्या भाजपने आता ३३ च्या खाली येणार नाही, अशी नमती भूमिका घेतली आहे. तथापि, पक्षप्रवेशाचा दुसरा अध्याय काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाल्याने शिंदेसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही जागा वाटप तडजोड न करण्याची भूमिका घेतल्याने महायुतीतील जागा वाटपाचा संघर्षाचा तिढा वाढत चालला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यांचे १९ प्रभाग, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा तयार करण्यत आला आहे . ८१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीतील थोरला भाऊ असलेल्या भाजपची जागा वाटपाची भूमिका आधीपासूनच आक्रमक राहिली आहे. मात्र आता ती किंचित मवाळ होताना दिसत आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर भाजपचा होईल, असे म्हणत वादाची फोडणी घातली होती. पाठोपाठ खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिकेच्या ४५ जागा लढविणार आणि महापौर भाजपचाच करणार, असा दावा केला. गतवेळी भाजप १४ आणि ताराराणी आघाडी १९ जागा अशा ३३ जागांसह काँग्रेसने जिंकलेल्या १२ जागांवर भाजपचे उमेदवार असतील, असा दावा केला. त्याला शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महापौर शिंदेसेनेचा होईल, असे सांगून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दोन महिन्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटप, महापौर पदावरून जुगलबंदी रंगली होती. या आठवड्यात जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी तथा विनायक पाटील यांच्यासह काहींनी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना भाजपचा ४५ जागांवरील दावा ३३ जागांवर येऊन घसरला. जागा वाटपातील तिढा पाहता भाजपची भूमिका भाजपने एक पाऊल मागे घेतली की काय असे चित्र निर्माण झाले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावेळी भाजप आणि महाडिक यांची ताराराणी आघाडी यांनी ३३ जागा जिंकल्या होत्या. त्या कायम राहतील. सर्वेक्षणाच्या आधारे काही जागांमध्ये बदल होऊ शकतो, अशी भूमिका मांडत मंत्री पाटील यांनी सर्वाधिक जागा भाजपकडे ओढून घेण्याची रणनीती कायम ठेवली आहे.
दरम्यान या जागा वाटपाबाबत एकनाथ शिंदे शिवसेना तितकीच आक्रमक आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक माजी महापौरासह डझनभर माजी नगरसेवक पक्षात दाखल झाले. त्याआधी दोन महिन्यापूर्वी तीन माजी महापौरांसह डझनभर नगरसेवकांनी प्रवेश केला होता. शिंदे सेनेत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, ठाकरे सेना अशा विविध पक्षातील इच्छुकांचा तडाका प्रवेश होण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्नशील आहेत. अर्थात या सर्वांना उमेदवारी द्यायची असल्याने शिंदेसेनेही जागा वाटपाच्या संख्येबाबत आक्रमक भूमिका आहे. तर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पुरेशा जागा न मिळाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा दिला असल्याने जागावाटप हा महायुतीमध्ये कळीचा मुद्दा बनत चालला आहे.
