Namaz at Shaniwar Wada : पुण्यातील शनिवार वाडा परिसरात सामूहिक नमाज पठण झाल्याचा आरोप भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला. त्या संदर्भातील काही पुरावेही त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले. हा प्रकार समोर येताच हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत परिसरात आंदोलने केली. या आंदोलनादरम्यान शनिवार वाड्याला लागून असलेली कबर हटवण्याची मागणी करण्यात आली. नेमकी ही कबर कुणाची आहे? या कबरीचा इतिहास काय? असे प्रश्न असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. त्यांनी या कबरीबाबत काय सांगितले? ते जाणून घेऊ…

पांडुरंग बलकवडे काय म्हणाले?

साम टीव्हीशी संवाद साधताना पांडुरंग बलकवडे म्हणाले, “मुळात या घटनेचे दोन भाग आहेत. त्यातील पहिला भाग हा शनिवार वाड्याला मिळालेल्या राष्ट्रीय स्मारकाचा आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या आत काही बुरखाधारी महिलांनी सामूहिक नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला. खरेतर शनिवार वाड्यात आजपर्यंत नमाज पठण करण्याची कोणतीही घटना घडल्याची नोंद नाही. मुळात राष्ट्रीय स्मारकात कुणालाही अशा प्रकारचा धार्मिक कार्यक्रम करण्याची परवानगी नाही, तरीहीदेखील ही घटना घडल्याने त्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले असावे असे मला वाटते, त्यामुळे सरकारने या प्रकरणाचा योग्य पद्धतीने विचार केला पाहिजे.”

मकबूल हुसैन मदनी कोण होता?

पुढे बोलताना बलकवडे म्हणाले, “शनिवार वाड्याच्या उत्तर बाजूला दिल्ली दरवाजा आणि त्या शेजारीच मस्तानी दरवाजा आहे. या लहान दरवाजासमोर एक कबर आहे. गेल्या २०० वर्षांपासून त्या कबरीजवळ एक बोर्ड उभा असून त्यावर मकबूल हुसैन मदनी असे नाव लिहिण्यात आलेले आहे. त्यावरील तारखेवरून असे लक्षात येते की, १८२९ साली ही कबर उभारण्यात आली आहे. मुळात मकबूल हुसैन मदनी ही व्यक्ती कोण होती याची नोंद ब्रिटीशकालीन इतिहासातही सापडत नाही, त्यामुळे ही कबर खरेच त्या काळातील आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. माझ्या समजुतीनुसार मी शनिवार वाड्याच्या अगदी जवळ राहतो. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून ही कबर इथे असल्याची नोंद आहे. या कबरीवर बसविण्यात आलेल्या टाईलही अगदी आधुनिक आहे.”

आणखी वाचा : Political News : नितीश कुमारही एकनाथ शिंदेंच्या वाटेवर? बिहारमध्ये भाजपाची रणनीती काय?

ती कबर समशेर बहादूर यांची? बलकवडे काय म्हणाले?

“देशात जिथे जिथे राष्ट्रीय स्मारके आहेत, तिथे ब्रिटीश काळामध्ये अशा प्रकारच्या वादग्रस्त वास्तू उभ्या आहेत. कारण दोन समाजात या वास्तूंवरून तेढ निर्माण झाल्याने त्याचा फायदा ब्रिटीशांना होऊ शकत होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मला आठवतंय, मी लहान असताना या कबरीजवळ कोणताही बोर्ड नव्हता. त्यावेळी असे सांगितले जात होते की, मस्तानीचा मुलगा समशेर बहादूर याची ही प्रतिकात्मक समाधी आहे. त्याने पानिपतच्या युद्धात सहभाग घेतला होता. मात्र, जखमी झाल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला, अशी इतिहासात नोंद आहे. त्याच्या स्मरणार्थ शनिवार वाड्याजवळ ही कबर बांधली गेली अशी त्यावेळी समाजामध्ये वार्ता होती. गेल्या १० ते २० वर्षांपासून इथे लावण्यात आलेली ही पाटी काल्पनिक आहे. याविषयी कुठलाही पुरावा नाही आणि जर असेलच तर त्यांनी ते निश्चितच सरकारसमोर मांडले पाहिजे.”

मस्तानी शनिवार वाड्यात आलीच नाही- बलकवडे

“सध्या शनिवार वाड्यात असलेल्या या कबरीची जागा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतील आहे, त्यामुळे अशा जागेवर कोणतेही धार्मिक कार्यक्रम झाल्याची इतिहासात नोंद नाही. १० जानेवारी १७३० रोजी शनिवार वाड्याचे भूमिपूजन झाले आणि २२ जानेवारी १७३२ रोजी त्याची वास्तूशांती झाली. मुळात मस्तानी शनिवार वाड्यात आल्याची नोंद नाही. कोथरूडमध्ये त्यांना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती, अशी कागदोपत्री नोंद आहे. समशेर बहादूर आणि पेशवे कुटुंबीयांचे जवळचे नाते होते. उत्तर हिंदूस्तानच्या राजकारणात तो पेशवे कुटुंबीयांचा प्रतिनिधी म्हणूनच होता आणि त्याचा मुलगा अली बहादूर हादेखील पेशव्यांच्या अधिकृत घरातला प्रतिनिधी म्हणूनच ओळखला जायचा”, असेही इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : निवडणूक बिहारची, पण चर्चा मात्र एकनाथ शिंदेंची; कारण काय? कन्हैया कुमार यांनी काय सांगितलं?

नमाज पठणावरून महायुतीतच जुंपली

दरम्यान, शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीतील दोन मित्रपक्ष भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुंपल्याचे पाहायला मिळाले. भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी टीका केली आहे. मेधा कुलकर्णी कशासाठी आंदोलन करत आहेत? शनिवार वाडा हे मराठ्यांच्या साम्राज्याचे प्रतीक आहे. ते ऐतिहासिक स्थळ आहे. सर्वजण तिथे जातात. मात्र, मेधा कुलकर्णी यांनी अशा प्रकारे आंदोलन करणे चुकीचे आहे. भाजपाने त्यांना आवरले पाहिजे. एखादी महिला शनिवारवाडा बघायला तिकडे गेली आणि तिथे चादर अंथरून तिने प्रार्थना केली, दुवा मागितली तर त्यात चुकीचे काय? त्या महिलांचे काय चुकले?” असा प्रश्न रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.