पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडील १२ मते शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जयंत पाटील यांना दिली. त्याच वेळी काँग्रेस आणि शिवसेनेनेही उमेदवार उभा केला. मात्र, विधान परिषदेतील निवडणुकीतील डावपेचात मतभिन्नता झाली. त्यामुळे पाटील यांचा पराभव झाला. पक्षाला कोणी फसविले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन, तर महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीतील उमेदवार होते; तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र, पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पराभवाचे कारण स्पष्ट केले.

हेही वाचा >>> राजकीय हालचालींना वेग; विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी बैठक

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना शेकापसह अन्य घटक पक्षांनी काही जागा मागितल्या होत्या. मात्र, त्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे विधानपरिषद व आगामी विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना संधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडील १२ मते जयंत पाटील यांना देण्यात आली. काँग्रेसकडे ३७, शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे १६ मते होती. काँग्रेसने त्यांच्याकडील सर्व ३७ मते त्यांच्याच उमेदवाराला द्यायला हवी होती. दुसऱ्या क्रमांकाची मते विभागून शिवसेना व शेकापच्या उमेदवाराला मिळणे आवश्यक होते. पहिल्या पसंतीची मते आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याने ती विभागली जातील आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळतील, असे धोरण आखले असते, तरी चित्र वेगळे दिसले असते.

राज ठाकरेंवर टीका

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून राज्यात जातीय तेढ निर्माण झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. याबाबत पवार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, ‘असे बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. दोन-चार, आठ-दहा दिवसांनी किंवा महिन्यांनी जागे झाले, की ते अशी विधाने, टिप्पणी करतात.’

इंडियन एक्स्प्रेसआणि लोकसत्तावाचतो!

अजित पवारांबरोबर युती केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या साप्ताहिक विवेकमध्ये करण्यात आली आहे. याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला देत शरद पवार म्हणाले, ‘मी दिल्लीत असलो की ‘इंडियन एक्स्प्रेस’ हे इंग्रजी वर्तमानपत्र, तर मुंबईमध्ये असलो की ‘लोकसत्ता’ सर्वप्रथम वाचतो.’ पत्रकारितेसंदर्भात भाष्य करताना ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अन्य मित्रांसोबत वर्तमानपत्र सुरू केले होते. मी एका वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम केले आहे. अलीकडे माध्यमांचा प्रभाव वाढला आहे. वृत्तपत्र आणि माध्यमांमागे अदृश्य शक्ती आहे.

महाविकास आघाडीत नेतृत्वाचा प्रश्नच नाही

पुणे : राज्यातील राजकीय अस्थिरता दूर करण्याची आवश्यता आहे. नागरिकांनाही बदल हवा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे उत्तम चालेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वावरून कोणताही वाद नाही आणि नेतृत्वाचा प्रश्नही उद्भवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातील वार्तालाप कार्यक्रमावेळी पवार यांनी हा दावा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीनंतर बहीण, भावांची आठवण

आमचा प्रशासकीय यंत्रणेशी सुसंवाद होता. मात्र, अलीकडे हवे तसे निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अधिकाऱ्यांना आदेश दिले जातात. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी अनेक अर्थसंकल्प सादर केले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला बहीण आणि भावांची आठवण झाली आहे, अशी टीका त्यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून केली.