अलिबाग- शेकापच्या चित्रलेखा पाटील आणि शिवसेनेच्या मानसी दळवी यांच्यात काल मिठेखार येथे झालेल्या वादाचे पडसाद आज अलिबागमध्ये उमटले. शिवसेना आणि शेकाप दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून विठा मोतीराम गायकर (७५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापच्या महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आपल्‍या सहकाऱ्यांसह तेथे दरडग्रस्‍त कुटुंबांना दिलासा देण्‍यासाठी पोहोचल्या. शोकाकूल वातावरणात चर्चा सुरू असतानाच विषय भरकटला. चित्रलेखा पाटील यांनी नादुरुस्‍त रस्‍त्‍यांचा विषय काढत हे खोकेवाले काही करणार नाहीत असे म्‍हणताच मानसी दळवी यांनी त्‍यांना जाब विचारला आणि दोन्‍ही गटांत वाद सुरू झाला. बघता बघता प्रकरण हातघाईवर आले. या वादाचे पडसाद बुधवारी अलिबागमध्ये उमटले.

शेतकरी कामगार पक्षाने शेतकरी भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यानंतर शिवसेना नेत्या मानसी दळवी आणि त्यांच्या समर्थकांच्या दंडेलशाहीचा निषेध केला. शिवसेना नेत्यांची दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे यांनी दिला. काळेझेंडे आणि बॅनर घेऊन शिवसेना नेत्या मानसी दळवी आणि भाग्यता पाटील यांचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही खाणाव येथे मोर्चा काढत चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरड दुर्घटनेच्या शोकाकूल परिस्थितीत चित्रलेखा पाटील राजकारण करण्याची गरज नव्हती, आपदग्रस्तांना मदत करण्यास प्राथमिकता देणे आवश्यक होते. शोकाकूल परिस्थितीत गावकरी असताना चित्रलेखा पाटील यांनी खोके खोके करुन राजकारण सुरू केले त्यामुळे शिवसैनिकांकडून सहाजिक प्रतिक्रिया उमटली, असे शिवसेना महिला संपर्क प्रमुख संजिवनी नाईक यांनी स्पष्ट केले. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात या मोर्चावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. महाड, रोहा, नागोठण्यासह अलिबाग तालुक्यातील रामराज पट्ट्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरड कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तीने रायगड त्रस्त झाला असताना जिल्ह्यातील दोन प्रमुख पक्षांनी जनसामान्यांना आधार देण्याऐवजी राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपदग्रस्त कुटुंबांमध्ये नाराजीचा सूर आहे. नेत्यांनी परिस्थितीचे गांभीर्य जाणून तारतम्य बाळगणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.