मुंबई: बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे केवळ ४३ आमदार असताना नितीशकुमार यांना भाजपने मुख्यमंत्रीपद दिले आहे. तोच ‘बिहार पॅटर्न’ राज्यात राबविला जाईल, असा विश्वास शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करत नाही हे सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजप पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी देईल, असा टोलाही म्हस्के यांनी लगावला.

मुख्यमंत्रीपदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षात रस्सीखेच सुरू आहे. शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. प्रसारमाध्यमांना ठरवून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कोणी शिंदे यांच्या विकास पुरुषाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत, तर कोणी लाडक्या बहिणीचा महायुतीला झालेला फायदा सांगत आहे. त्यांनी राबवलेल्या योजना आणि उपक्रम यांमुळे हे यश मिळाले असल्याचे ठासून सांगितले जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ योजना किती प्रभावी ठरली हे पटवून दिले जात आहे.

हेही वाचा >>>शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेतेपदी भास्कर जाधव; फूट टाळण्यासाठी सर्व आमदारांकडून शपथपत्र

शिंदे यांचे निकटवर्तीय खासदार नरेश म्हस्के यांनी ‘बिहार पॅटर्न’चा मुद्दा अधोरिखित केला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या पक्षाला २४३ पैकी ४३ जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने पाठिंबा दिला. राज्यात बिहार पॅटर्न राबविण्यात यावा यासाठी शिंदे पक्षाची व्यहूरचना सुरू आहे. भाजप मित्रपक्षाला संपवते असा प्रचार शिवसेना ठाकरे पक्षाने अडीच वर्षांत केला. हा अपप्रचार आहे हे सिद्ध करण्याची संधी भाजपला चालून आली आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शीतल म्हात्रे यांच्याकडून ‘मराठा कार्ड’

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी तर शिंदे यांचे मराठा कार्ड पुढे आणले आहे. राज्यातील निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. राज्याचा मुख्यमंत्री ‘मराठा’ असायला हवा, अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी देऊन महायुतीत मीठाचा खडा टाकला आहे.