पुणे : महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांच्यादृष्टीने तयारी सुरू केली असताना, शिवसेना (शिंदे) पक्षाने बेरजेचे राजकारण आणि पक्षबांधणीसाठी अन्य पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे पक्षातील संख्याबळ वाढत चालले असले, अद्यापही पक्षाचा ‘आव्वाज’ दबलेला असल्याची स्थिती आहे. पुण्यात शिवसेनेची डरकाळी कानी पडण्यासाठी आता ‘मोठे मासे’ गळाला लावण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जुलै महिन्यात भव्य मेळावा घेऊन पक्षप्रवेशांसह शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करावी लागू नये, यासाठी पक्षात येण्याची इच्छा दर्शविणाऱ्याला पक्षप्रवेश देण्यात येत आहे. पुणे महानगर प्रमुख पदी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धंगेकर वगळता अद्याप अन्य पक्षांतील ‘मोठे मासे’ पक्षाच्या गळाला लागलेले नाहीत. सध्या धंगेकर आणि शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्याकडे पक्षाचा कारभार आहे. आगामी काळात महापालिकेत निवडून येऊ शकतील, असे इच्छुक उमेदवार पक्षामध्ये आणण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
पक्षाचा पुण्यातील आवाज वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेऊन महापालिका निवडणुकांच्या तयारीचे नियोजन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे पक्षाचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यावेळी पक्षप्रवेश होणार आहेत. त्यासाठी ‘मोठे मासे’ गळाला लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शहराध्यक्ष भानगिरे यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश करण्यात आले. त्यामध्ये काँग्रेसच्या माजी महिला शहराध्यक्षा सोनाली मारणे, माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी बाळा ओसवाल, विशाल धनवडे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची अल्हाट या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अविनाश साळवे हे काँग्रेसमध्ये गेले आहेत. पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि श्वेता चव्हाण हे तीन नगरसेवक अद्याप शिवसेना (ठाकरे) पक्षात आहेत. नाना भानगिरे हे एकच माजी नगरसेवक शिवसेना (शिंदे ) पक्षाकडे आहेत. त्यामुळे अन्य पक्षांतील माजी नगरसेवकांना प्रवेश देऊन पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.
आगामी महापालिका निवडणुकांच्यादृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे.अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाचा भव्य मेळावा जुलै महिन्यात गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावेळीही पक्षप्रवेश होणार आहेत. पक्षामध्ये येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. योग्य वेळी त्यांना प्रवेश दिला जाईल.’ – प्रमोद उर्फ नाना भानगिरे शहराध्यक्ष, शिवसेना (शिंदे)