कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नव्या राजकीय सोयरिक जुळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडे झुकलेले माजी राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुतीचे घटक पक्ष सोबत घेतले असले तरी त्यांच्या शाहू विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे. यड्रावकर यांना रोखण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी, दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी एकत्र येऊन लढत देण्याचा तयारी चालवली आहे. तालुक्यातील बदलती राजकीय समीकरणे निकालावर परिणामकारक ठरू शकतात.

शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर या सर्वात मोठ्या नगरपालिकेसह, सर्वात जुन्या कुरुंदवाड व दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणारी शिरोळ नगरपरिषद अशा तीन ठिकाणी निवडणूक होत आहे. या तालुक्यात सलग दुसऱ्यांदा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय मिळवत आपला प्रभाव निर्माण केला आहे. तो रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ही बाब लक्षात महायुतीच्या माध्यमातून राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आव्हान दिले जाऊ लागले.

एकूण वातावरण पाहून यड्रावकर यांनी महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सोबत जाण्याची भूमिका घेतली असली तरी चिन्ह त्यांच्या शाहू आघाडीचे असल्याने त्यांचा प्रभाव राहणार हे उघड आहे. आमदार पाटील यांना महा विकास आघाडीच्या छावणीत पुन्हा दाखल झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्याकडून कडवा प्रतिकार करण्याची तयारी सुरू आहे. येथे नगराध्यक्ष सर्वसाधारण गटासाठी इच्छुक असल्याने यड्रावकर कुटुंबातून पुन्हा उमेदवारी दिली जाणार का, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे अध्यक्षपदाचे उमेदवार असणार का याचीही मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

छोटेखानी संस्थानाचे गाव असणाऱ्या कुरुंदवाड नगरपालिकेतही आमदार यड्रावकर यांनी भाजपचे जेष्ठ स्थानिक नेते रामचंद्र डांगे यांना आपल्याकडे वळवून मोठी चाल खेळताना विरोधकांना धक्का दिला आहे. यामुळे येथे भाजपला गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली लढत द्यावी लागणार आहे. जिल्हा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसचे स्थानिक नेते जयराम पाटील यांनी तगडी लढत देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. कुरुंदवाड येथे महिला नगराध्यक्ष आरक्षण असले तरी दोन्ही आघाड्यांकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अनिश्चित आहे.

दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण राखीव आहे. येथेही आमदार राजेंद्र पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चाबूकफोड आंदोलन करून चर्चेत आलेले दादा काळे यांना सोबत घेतले असून त्यांच्या पत्नी श्वेता काळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या माध्यमातून येथे सुद्धा यड्रावकर यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. त्यांच्या विरोधात स्थानिक प्रभावी यादव गटाकडून अनिल यादव, पृथ्वीराज यादव यांनी येथे राजू शेट्टी, गणपतराव पाटील यांना सोबत घेतले आहे.

विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटने मध्ये घरवापसी केलेले माजी आमदार उल्हास पाटील हे महाविकास आघाडीच्या गोटात असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या तिन्ही नगरपालिकांची निवडणूक नव्या बदलत्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर चुरशीने होण्याची चिन्हे दिसत आहेत.