कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगाव  कृषी पाणी पुरवठा योजनेचे राजकीय वळण आता तिसऱ्या नेतृत्वाच्या दिशेने वाहू लागले आहे. शिरोळ  तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची ही मूळची योजना पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडे गेली. तर उद्या शुक्रवारी ती कल्लाप्पाण्णाआवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ती या कारखान्याकडे हस्तांतर होणार असल्याने त्याची राजकीय चर्चा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच जवाहर कारखान्यालाही ही योजना लाभदायी ठरण्याची शक्यता आहे.

 स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी दिवंगत मंत्री, खासदार रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी शिरोळ तालुक्याचे सहा वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करतानाच इचलकरंजी जवळ पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याने शिरोळ- हातकणंगले तालुक्याच्या उजाड माळ रानावर उसाची हिरवाई आणण्याचे काम केले.

नव नेतृत्वाचा शोध

  पुढे रत्नाप्पाण्णा कुंभार व शामराव पाटील यड्रावकर यांच्या राजकीय धुमचक्रित कारखान्याची अधोगती होत राहिली. परिणामी,  कुंभार यांनी त्यांच्या जन्म गावी म्हणजे निमशिरगाव येथे ४० वर्षांपूर्वी सुरू केलेली कृषी पाणी पुरवठा योजना गटांगळ्या खात राहिली. शेतकऱ्यांना पाणी मिळण्यात अडचणी आल्याने पिकवायचे कसे याची चिंता सतावू लागली. त्यावर शेतकऱ्यांनी योजना सक्षम पणे कोण चालू शकेल याचा शोध सुरू केला. ही पाणी योजना चालवायला घघेण्यासाठी उद्योगपती संजय घोडावत, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे आदी नेत्यांना साकडे घालण्यात आले होते.

राजू शेट्टी पर्व

 काही सभासद शेतकऱ्यांनी तत्कालीन खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडे धाव घेऊन पाणी योजनेत मार्ग काढावा अशी मागणी केली. तेव्हा या कारखान्यावर भूविकास बँकेचे मोठे कर्ज होते. शेट्टी यांच्या प्रयत्नातून एकरकमी कर्जफेड योजना राबवली गेली. आणि ही योजनेचे कामकाज शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चालू लागले. तथापि ही पाणी योजना जुनी असल्याने जलवाहिनीला अनेक ठिकाणी, वारंवार गळती लागणे, काही ठिकाणी ती फोडून त्यातील पाणी काढून घेणे, विजेचा अपुरा पुरवठा, अल्प प्रमाणात वसुली अशा कारणांमुळे योजना सक्षमपणे चालली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ही योजना कोणाकडून चालवली जाईल याचा शोध सुरू राहिला.

आवाडेंच्या हाती सूत्रे

 त्यातून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे अध्यक्ष असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ही योजना चालू करण्यासाठी चालवण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. यामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, संचालक आमदार राहुल आवाडे यांनीही लक्ष घातले. या योजनेची जलवाहिनी, विद्युत – सौर मोटार अन्य कामे आदींसाठी जवाहरला सुमारे आठ ते दहा कोटी रुपये खर्च करावे लागतील. ७ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या पाणी योजनेमुळे सुमारे ५० हजार एकर ऊस जवाहर कारखान्याला उपलब्ध होऊ शकतो, असे पाणी योजनेचे सभासद सांगतात.

संघर्ष ते एकी

राजकीय पातळीवर राजू शेट्टी – आवाडे यांच्यात  संघर्ष असला तरी या पाणी योजनेच्या निमित्तानेच दोघे एकत्र येत असून त्यातून ऊस उत्पादकांना पाणी मिळून त्यांचे भले होण्याची चिन्हे आहेत. त्यानिमित्ताने दोघांच्या उपस्थितीत एक बैठक ही या गावात पार पडली. यावेळी प्रकाश आवाडे यांनी ‘ बदलत्या काळानुरुप नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगांव परिसर सहकारी कृषी पाणी पुरवठा याेजना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वीपणे चालवेल. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल हाेईल. त्याचबराेबर स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पाहिलेले स्वप्न सर्वांनी मिळून साकार करुया,’ असे शेतकऱ्यांना आश्वासित केले.