मुंबई: लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा कानमंत्र शिवसेना शिंदे पक्षाचे मुख्य नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांना दिला. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कॅबिनेट मंत्र्यांची खास बैठक पार पडली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना ठाकरे पक्ष व शिवसेना शिंदे पक्ष या दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई सह या निवडणुका प्रतिष्ठेच्या आहे. त्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाने जोरदार तयारी सुरु केली असून ठाकरे पक्षातील स्थानिक नेते गळाला लावले जात आहेत.
दररोज राज्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधींची शिंदे पक्षात प्रवेश होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षापेक्षा शिंदे पक्षाची कामगिरी काकणभर सरस ठरली होती. विधानसभा निवडणुकीतही कमी (८०) जागा लढवून शिंदे पक्षाने ५७ जागी विजय मिळविला आहे. . मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यासोबत शिंदे यांनी संवाद साधला.
मंत्री व पालकमंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. काही ठिकाणी मित्रपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याबरोबरच शेजारच्या जिल्ह्रयाची जबाबदारी स्विकारावी लागणार आहे. राज्यातील स्थानिक नेत्यांना सर्व प्रकारची ‘रसद’ पुरविण्याची तयारी ठेवण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले. शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ‘तयारीला लागा’ असा संदेश या बैठकीत दिला.