छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेच्या व्यासपीठावरचे आणि सभांमधून दिसणाऱ्या गर्दीचे सरासरी वय चाळिशीच्या पुढे गेल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या अतिवृष्टी पॅकेजवर भाष्य करण्यासाठी आयाेजित ‘ दगा बाज रे’ या शीर्षकाखालील दौऱ्यात ही बाब अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ६५ वा वाढदिवस साजरा केला. विरोधी पक्ष नेते पदावरून निरोप घेणारे शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे वय साठीकडे जाणारे आहे. दुसरे नेते चंद्रकांत खैरे हे सत्तरीच्या घरात आहेत. अगदी आमदार मिलिंद नार्वेकरही पन्नाशीच्या पुढचेच. धाराशिवमधील खासदार ओम राजेनिंबाळकर आणि कैलास पाटील यास अपवाद. फक्त नेतेच नाही तर शिवसेनेच्या छोट्या सभांमध्ये दिसणाऱ्या गर्दीतील व्यक्तींचे वयही चाळिशीच्या पुढचे असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचे सरासरी वय वाढत असल्याचे परिणाम शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर होताना दिसत आहेत. आंदोलनातील ‘ सेनास्टाईल’ अलिकडे भाषणातून इशारे देण्यापर्यंतच मर्यादित झाली आहे. शिवसेनेकडे आकर्षित होणारा विशी-तिशीमधील वयोगटातील तरुण पदाधिकारी मेळाव्यातही क्वचितच दिसतात.

मराठवाड्यात नामांतर चळवळ आणि शिवसेनेची वाढ ही दोन विरुद्ध टोके असली तरी त्यांची वाढ एकाच काळातील. तरुणाईचा मोठा ओढा दोन्ही बाजूला होता. गेल्या ४० वर्षातील सामाजिक व राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून असणारे प्रा. ऋषिकेश कांबळे म्हणाले, ‘आम्ही नामांतर चळवळीत काम करत होतो. पण शिवसेनेची वाढही पाहत होतो. १९८८ पासून मराठवाड्यात शिवसेनेला बाळसे मिळत गेले. वाढ वेगाने सुरू होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाचे तरुणाईला आकर्षण होते. विशेषत: गावातील प्रस्थापित नेत्यांना आव्हान देऊ शकणारा तरुणांचा मोठा वर्ग शिवसेनेत दिसत होता. पण बाळासाहेब ठाकरे यांनी या तरुणाईला धार्मिक वळण दिल्याने आम्हाला तो विचार पटत नव्हता. पण मराठवाड्यातील तरुण दोनच चळवळीत विभागला गेला होता. आता चित्र बदलेले आहे.’

एका बाजूला शिवसेनेतील गर्दीचे वय जरी वाढत असले तरी सरकार विरोधाची उद्धव ठाकरे यांची भाषाही अधिक आक्रमक होत आहे. मात्र, शिवसेनेतील फाटाफुटीनंतर तरुणांच्या पक्षातील गर्दीला घसरण लागली. मात्र, तरुणांची गर्दी जातीय आरक्षण मागणीच्या आंदोलनात ठसठशीत दिसून येत आहे. सत्तेच्या अधिक जवळ राहिल्यास अधिक निधीच्या वाटेने सहज जाता येते, हे अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटत असल्याने ते आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाताना दिसत आहेत. दुसरीकडे १८ ते २५ वयोगटातील युवकांनी रा. स्व. संघाचे सभासद व्हावे, असे प्रयत्नही आवर्जून सुरू आहेत. या नोंदणीवरून अलीकडेच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेही नोंद झाले. त्यातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनातही तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला होता. मराठा आरक्षण आंदोलन, बंजारा आंदोलन, धनगर आरक्षण तसेच महादेव कोळी आंदोलनातही तरुणांचा सहभाग वाढला होता. राज्यशास्त्राचे प्राध्यापक ह. ना. सोनकांबळे म्हणाले, आता तरुणांना जातीय नेते जवळचे वाटत आहेत. आरक्षणातून प्रश्न सुटतील, असे वाटत असल्याने तरुणांचा ओढा राजकीय पक्षाकडे कमी झाला आहे.