छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार व परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाकरे सेनेचे आमदार असलेल्या प्रवीण स्वामी यांनी घरी बोलावून पाहुणचार केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात भुवया उचावल्या आहेत.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करीत निवडून ठाकरे सेनेचे प्रवीण स्वामी निवडून आले. ठाकरे सेनेचे आमदार व पदाधिकारी आपल्याकडे यावेत असे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याने प्रताप सरनाईकांचा पाहुणचार धाराशिव जिल्ह्यात नजरेत भरणार ठरला .

हा मतदारसंघ नेहमी ठाकरे यांच्या पाठिशी राहणारा. प्रयोगशाळा सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या ज्ञानराज चौगुले यांना खासदार रवींद्र गायकवाड यांनी उमेदवारी मिळवून दिली. सलग तीन वेळा या मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले यांनी धनुष्यबाणाला विजय मिळवून दिला. पुढे ते शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले. पुढे चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या ज्ञानराज चौगुले यांना पराभव स्वीकारावा लागला.

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असलेल्या प्रवीण स्वामी यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी ठाकरे सेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जोरदार प्रयत्न केले. ऐनवेळी स्वामी यांची उमेदवारी जाहीर झाली आणि सलग चौथ्या विजयासाठी शड्डू ठोकून उभे असलेल्या ज्ञानराज चौगुले यांना नवख्या प्रवीण स्वामी यांनी पराभवाचे धूळ चारली. खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याबरोबर वावरणाऱ्या स्वामी यांनी कोणतीही जाहीर भूमिका घेतली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, पाहुणाचारामुळे ते चर्चेत आले आहेत. या अनुषंगाने आमदार स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. सरनाईक हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्हा विकासाचा निधी त्यांच्या परवानगीने दिला जातो. मतदारसंघांचे प्रश्न सोडविण्यासाठी अशा भेटी कराव्या लागतात. त्यात कोणतेही राजकारण नव्हते.’