संतोष प्रधान

कर्नाटकमध्ये सत्ता मिळण्याची आशा निर्माण होताच काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष शिवकुमार हे दोन्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार उमेदवारी वाटपात आपल्या समर्थकांना अधिक तिकिटे कशी मिळतील या दृष्टीने नियोजन करीत आहेत. यातूनच पक्षाच्या मुख्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू झाली आहे. त्यातच शिवकुमार मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असे विधान सिद्धरामय्या यांनी केल्याने पक्षांतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत.

कर्नाटक काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उर्वरित १०० जागांवरील यादीवरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांनी आपापल्या समर्थकांसाठी ताणून धरले आहे. निवडणूक काळात पक्षाच्या मुख्यालयासमोर होणारी गर्दी, निषेधाच्या घोषणा, नेत्यांचा जयजयकार हे सारे चित्र गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमधील पक्षाच्या मुख्यालयासमोर दिसू लागले आहे.

आणखी वाचा- वादाचे दुसरे नाव काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे!

पक्षध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांची दोन्ही गटांमध्ये सहमती घडविताना मोठी कसोटी लागणार आहे. सिद्धरामय्या यांना दूर ठेवल्यास त्याचे पक्षाला परिणाम भोगावे लागतील, असा जाहीरपणे इशारा त्यांचे समर्थक देऊ लागले आहेत. सिद्धरामय्या यांना स्वत:ला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असून, शिवकुमार यांचे पंख कापण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

आणखी वाचा- बंगालमधील दंगलीमुळे तृणमूल काँग्रेस अडचणीत; अल्पसंख्याक समुदाय नाराज, तर विरोधकांना राजकारणाची आयती संधी

पक्षाला पुन्हा सत्ता मिळाल्यास शिवकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत, असे सिद्धरामय्या यांचे वक्तव्य हे वृत्तवाहिनीच्या कॅमेरात कैद झाले. यावरून राज्य काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष किती तीव्र आहे हेच सिद्द होते. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि भांडणे भाजपला फायदेशीर ठरू शकतात. कारण परस्परांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न दोन्हीकडून होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांना मुख्यमंत्रीपदाची घाई झाली आहे. नेतृत्वाचा संधर्षच काँग्रेससाठी तापदायक ठरणार आहे. भाजपमध्ये नेतृत्वाची स्पर्धा असते, पण मोदी-शहा यांच्या धाकाने स्पर्धा उघडपणे समोर येत नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा धाक नसल्यानेच स्थानिक नेतेमंडळींचे फावते.