Bihar BJP Dispute बिहारमधील राजकारण सध्या तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने चर्चांना उधाण आले आहे. ‘जन सुराज पार्टी’चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण द्या किंवा आपल्या पदावरून पायउतार व्हा, अशी थेट मागणी आर.के. सिंह यांनी केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? बिहारमधील निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षांतर्गत कलह भाजपासाठी अडचणीचा ठरेल का? बिहारमध्ये नक्की काय घडतंय? जाणून घेऊयात…

भाजपाचे ज्येष्ठ नेते काय म्हणाले?

  • आर.के. सिंह यांनी विशेषतः सम्राट चौधरी यांनी त्यांची पदवी सार्वजनिक करावी अशी मागणी केली.
  • माध्यमांशी बोलताना ७२ वर्षीय आर.के. सिंह म्हणाले की, “या नेत्यांनी साधलेले मौन पक्षाची विश्वासार्हता बिघडवत आहे.”
  • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपला आरा मतदारसंघ गमावल्यापासून सिंह हे पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहेत.
  • एनडीएचे घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा करत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

सिंह म्हणाले, “त्यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रशांत किशोर सतत म्हणत आहेत की सम्राट चौधरी सातवी नापास आहेत, त्यामुळे त्यांनी लोकांना आपली पदवी दाखवावी. अन्यथा, याचा पक्षाच्या प्रतिमेवर आणि विश्वासार्हतेवर वाईट परिणाम होत आहे.” त्यांनी प्रशांत किशोर यांच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ दिला. त्यात किशोर यांनी अनेक बिहारी मंत्र्यांवर आणि भाजपा-जेडीयू नेत्यांवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप केले होते.

“असेही म्हटले जात आहे की सम्राट चौधरी यांनी आपले नाव तीन-चार वेळा बदलले आहे. त्याचप्रमाणे, दिलीप जयस्वाल यांच्यावर खुनाचा आरोप आहे,” असेही त्यांनी सांगितले. या नेत्यांनी एकतर प्रशांत किशोर यांच्या आरोपांना कायदेशीर प्रत्युत्तर द्यावे किंवा पदावरून बाजूला व्हावे, अशी भूमिका आर. के. सिंह यांनी मांडली.

कोण आहेत आर. के. सिंह?

१९७५ च्या बॅचचे बिहार केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी असलेले सिंह यांनी केंद्रीय गृह सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१३ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावर आरा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम केले आहे.

२०२४ च्या निवडणुकीत त्यांना सीपीआय (एमएल) नेते सुदामा प्रसाद यांच्याकडून ५९,८०८ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून ते बिहारमधील एनडीए नेत्यांवर, विशेषतः आपल्याच पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्यांनी आपल्या विरोधात काम करणाऱ्यांविरुद्ध प्रचार करण्याचीही धमकी दिली आहे.

पक्षातील नेत्यांवर नाराजी

सिंह यांनी दावा केला की, त्यांनी पक्ष अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सांगितले आहे की, जर अमरेंद्र प्रताप सिंह (आरा) आणि राघवेंद्र प्रताप सिंह (बरहरा) या दोन विद्यमान भाजपा आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली गेली, तर ते त्यांच्या विरोधात प्रचार करतील. त्यांनी या आमदारांबद्दल जेडीयू नेत्यांनाही सावध केले असल्याचा दावा केला. “मी माझ्या पक्ष अध्यक्षांना तसेच जेडीयूच्या प्रमुखांना स्पष्ट केले आहे की, जर या व्यक्तींना तिकीट दिले, तर मी त्यांचा विरोध करेन. भगवान सिंह कुशवाहा यांचा गुन्हेगारी इतिहास कुप्रसिद्ध आहे. त्यांनी माझ्या विरोधात आरजेडीकडून निवडणूक लढवली होती आणि आता ते जेडीयूमध्ये सामील झाले आहेत. मी ऐकले आहे की जेडीयू त्यांना तिकीट देण्याचा विचार करत आहे. असे झाले तर मी त्यांच्या विरोधात प्रचार करेन.”

ते पुढे म्हणाले, “दुसरे नाव राधा चरण शाह यांचे आहे. ते सुद्धा जेडीयूचे आहेत. त्यांचा भूतकाळ वादग्रस्त आहे. त्यांना ईडीने अटक केली होती आणि तरीही त्यांना आमदार करण्यात आले. मी त्यांच्या विरोधातही सक्रियपणे प्रचार करेन,” असे सिंह यांनी सांगितले. स्वत: निवडणूक लढवण्याच्या योजनेबद्दल त्यांना विचारले असता, सिंह म्हणाले की, पक्ष सांगेल तरच ते निवडणूक लढवतील. दरम्यान, जेडीयू नेते अशोक चौधरी यांनी मंगळवारी प्रशांत किशोर यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. किशोर यांनी त्यांचा संबंध २०० कोटी रुपयांच्या संशयास्पद जमीन खरेदीशी जोडला होता.