संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या सिंदखेडराजा बाजार समितीची निवडणूक विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरण्याची चिन्हे आहेत. ही निवडणूक अजित पवार समर्थक आमदार राजेंद्र शिंगणे यांचा कस पाहणारी आहे.

समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळासाठी येत्या १२ ऑगस्ट रोजी निवडणूक होऊ घातली आहे. अंतिम मुदतीत १८ जागांसाठी तब्बल १५७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. एका जागेसाठी सरासरी ९ अर्ज दाखल झाल्याने व त्यातही आपल्याच समर्थकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने शिंगणेंची डोकेदुखी वाढली आहे. माघारीच्या मुदतीत किती जणांची नाराजी दूर करण्यात ते यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिंदखेड राजा मतदारसंघासह जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात शिंगणेंचे वर्चस्व आहे. सामान्य राजकीय स्थिती असती तर त्यांनी अलीकडेच पार पडलेल्या देऊळगाव राजा समितीप्रमाणे एकतर्फी विजय येथे मिळवला असता. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे.

आणखी वाचा-विरोधी पक्षनेतेपद, भाजप आणि काँग्रेसचे समान दुखणे

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिंगणेंनी अजित पवारांना समर्थन दिले. यामुळे आता सिंदखेडराजा मतदारसंघातील राजकीय चित्र बदलले आहे. आजवरचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार शशिकांत खेडेकर (शिंदे गट) व भाजपला सोबत घेऊन शिंगणेंना ही निवडणूक लढवावी लागणार आहे. मतदारसंघात कमी ताकद असलेल्या भाजपला आपल्या बाजूने वळवणे त्यांच्यासाठी सोपे आहे. मात्र, खेडेकरांना सोबत घेणे, त्यांची जागावाटपाची अपेक्षा पूर्ण करणे, यासाठी शिंगणेंना तडजोड करावी लागणार आहे. शिंदे गटाचे मुख्य नेते खासदार प्रतापराव जाधव व शिंगणे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहेच. शिंदे गटाच्या दोन्ही नेत्यांना सांभाळून घेत निवडणुकीत विजय मिळवण्याचे जटील आव्हान शिंगणेंच्या समक्ष आहे. दुसरीकडे, आजवरचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससह महाविकास आघाडीच्या रूपाने दुहेरी आव्हानांचा सामना आमदार शिंगणेंना करावा लागणार आहे.

विधानसभेत तीन पक्षांच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, जाधव व खेडेकर या नेत्यांची भूमिका कळीचा मुद्दा राहणार, हेही उघड सत्य आहे. धूर्त राजकारणी असलेले आमदार शिंगणे बाजार समिती लढतीच्या माध्यमातून भविष्यातील या अडचणी कितपत व कशा दूर करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बाजार समितीच्या लढतीत मर्यादित मतदार आहेत. मात्र विधानसभेत दोनेक लाख मतदार आहेत. अजित पवारांना समर्थन व भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे अल्पसंख्याक व अन्य समाजातील मतदार शिंगणेंवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचे आणि गठ्ठा मतदान कायम राखण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे.

आणखी वाचा- NTC सुधारणा विधेयकावर बसपा तटस्थ भूमिका, ‘आप’ला बळ मिळणार

वरकरणी ही बाजार समितीची निवडणूक असली तरी ती पुढील वर्षी होऊ घातलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघाच्या रणसंग्रामची रंगीत तालीम समजली जात आहे. विधानसभा निवडणुकीतही शिंगणेंना अशाच राजकीय अडचणींचा सामना करावा लागणार, अशी दाट शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संग्रामपूरमध्येही चुरस

संग्रामपूर बाजार समितीची निवडणूकही चुरशीची व विविध पक्षीय नेत्यांचा कस पाहणारी ठरली आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांची मंत्रिपदाची संधी हुकली. त्यामुळे त्यांना या लढतीत आपली ताकद दाखवणे आवश्यक आहे. जळगाव बाजार समितीत त्यांना राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटील यांनी अस्मान दाखवले. संग्रामपूर नगर पंचायतीच्या लढतीत भाजपला यशाने हुलकावणी दिली. कागदोपत्री मित्र असलेल्या प्रहार संघटनेने सत्ता मिळवली. त्यामुळे बाजार समितीची लढत आमदार कुटेंसाठी आव्हान ठरली आहे. त्यांना उरलीसुरली राष्ट्रवादी व तिथे कमकुवत असलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन लढत द्यावी लागणार आहे. सध्या या लढतीपासून अलिप्त असलेले प्रसेनजीत पाटील हे आघाडी व वंचितसह मैदानात उतरले तर त्यांच्यासमोरील आव्हान आणखीनच कडवे होणार, असे चित्र आहे.