कर्नाटक विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतलेला असला तरी आमदार मडल विरूपक्षप्पा यांचे लाचखोरीचे प्रकरण भाजपाला अडचणीचे ठरत आहेत. या प्रकरणामुळे भाजपा पक्ष बॅकफूटवर गेला आहे. असे असतानाच येथील श्रीराम सेनेने कर्नाटक उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत कर्नाटकमधील लोकायुक्त पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. लोकायुक्त पोलीस मडल विरूपाक्षप्पा यांना अटक करण्याचे टाळत आहे, असा आरोपही श्रीराम सेनेने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> शिंदेबाबत आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपची सारवासारव

श्रीराम सेनेच्या याचिकेत काय आरोप करण्यात आला आहे?

श्रीराम सेनेच्या याचिकेमुळे भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. श्रीराम सेनेने शुक्रवारी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मडल विरूपक्षप्पा लाचखोरी आणि भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक लोकायुक्त पोलिसांकडून मडल विरूपक्षप्पा यांना अटक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच लोकायुक्त पोलिसांनी मडल विरूपाक्षप्पा यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केले, असा आरोप केला आहे. ही याचिका न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.

नेमके प्रकरण काय?

आमदार विरूपाक्षप्पा यांचा मुलगा प्रशांथ मडल याला २ मार्च रोजी आमदाराच्या वतीने लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले. लोकायुक्त पोलिसांचे छापे पडल्यानंतर आमदार विरूपाक्षप्पा भूमिगत झाले होते. नंतर आमदारांच्या निवासस्थानी सहा कोटींची रोकड आढळली होती. विरुपाक्षप्पा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांच्या जवळचे मानले जातात.

हेही वाचा >> देव एकच, उपासनापद्धती वेगवेगळ्या- मोहन भागवत

भाजपा नेत्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा

श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुत्तलिक यांनी भाजपाचे नेते सुनिलकुमार करकाला यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. याआधी मुत्तलिक यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मुत्तलिक यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार होता. मात्र त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन ऐनवेळी प्रवेश नाकारण्यात आला होता.

दरम्यान, उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या श्रीराम सेनेनेच भाजपाविरोधात दंड थोपटल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri ram sene files pil against bjp mla madal virupakshappa demand cbi probe prd
First published on: 18-03-2023 at 19:45 IST