आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते सुधाकर बडगुजर यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी त्यांच्या भाजपा प्रवेशाचे समर्थन केले आणि दावा केला की, या प्रवेशाला कोणताही विरोध नव्हता. भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध धुडकावत बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. एकेकाळी शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांचे जवळचे मानले जाणारे बडगुजर हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत.
त्यांच्यावर १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ‘सलीम कुत्ता’ याच्याबरोबर एका पार्टीत नाचल्याच्या व्हिडीओवरून भाजपाने टीका केली होती. बडगुजर यांच्यावर त्यावेळी भाजपाने अनेक आरोप केले होते. मात्र, त्यांच्या प्रवेशाने पक्षातील नेते नाराज का? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा त्यांच्या प्रवेशाला विरोध आहे का? भाजपाने नेत्यांचा विरोध डावलून त्यांना पक्षात स्थान का दिले? जाणून घेऊयात.

भाजपा नेत्यांचा पक्षप्रवेशाला विरोध का?
मंगळवारी भाजपा आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला जाहीरपणे विरोध केला. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्येष्ठ भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी सुरुवातीला त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी कोणतीही माहिती नसल्याचा दावा केला. शिवसेना (उद्धव ठाकरे) वर नाराज असलेले बडगुजर यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. बडगुजर यांच्यासह शिवसेना (उद्धव ठाकरे)चे आणखी एक माजी नेते बबनराव घोलप यांनीदेखील भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या मुंबई मुख्यालयात हा प्रवेश पार पडला. राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी बडगुजर आणि घोलप यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाला उपस्थिती दर्शवली.
बावनकुळे यांच्या नाराजीविषयी भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले, “बावनकुळे सुट्टीसाठी मकाऊ येथे गेले असताना एका कॅसिनोत खेळतानाचे त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर खळबळ उडाली होती. हे छायाचित्र बडगुजर यांनीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे दिल्याची चर्चा होती. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, बावनकुळे यांनी बडगुजर यांचा पक्षातील समावेश थांबवण्याच्या प्रयत्न केला, परंतु गिरीश महाजन यांनी या प्रवेशासाठी प्रयत्न केले. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसही त्यांच्या बाजूने होते.”
२०१४ आणि २०२४ च्या नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीत सीमा हिरे यांनी बडगुजर यांना पराभूत केले होते. पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे की, दोघांमधील तणाव भाजपाच्या नाशिक युनिटमध्ये दिसून येईल. अनेक स्थानिक नेत्यांनी असे म्हटले आहे की, यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे)चे नुकसान होईल, कारण नाशिक क्षेत्र त्यांचा बालेकिल्ला आहे आणि महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. मंगळवारी बडगुजर यांच्याबद्दल विचारले असता सीमा हिरे म्हणाल्या, “मी त्यांना देशद्रोही म्हणणाऱ्यांपैकी एक होते. त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांनी माझ्याविरुद्ध निवडणूकही लढवली. आता आपण त्यांचे स्वागत कसे करू शकतो?”
सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोप
- २०२३ मध्ये भाजपा आमदार नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कथित सहकारी आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सलीम कुत्ताला आश्रय दिल्याचा आरोप केला तेव्हा ते चर्चेत आले.
- त्याच सुमारास एका खाजगी कार्यक्रमात सलीम कुत्ताबरोबर नाचत असलेला बडगुजर यांचा व्हिडीओही समोर आला.
- यानंतर तत्कालीन महायुती सरकारने बडगुजर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.
- त्यानंतर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली. या निर्णयाविरोधात ते अजूनही न्यायालयात लढत आहेत.
भाजपाने बडगुजर यांच्यावरील आरोपांचा वापर शिवसेने (उद्धव ठाकरे)वर हल्ला करण्यासाठी केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी हा विषय अधिकच चिघळला. कारण विरोधकांनी असा दावा केला की, बडगुजर यांचा मुलगा दीपक याच्यावर २०२१ मध्ये एका हत्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेत निवडणूक लढवण्याचे बडगुजर यांचे सलग प्रयत्न हाणून पाडण्यात आले, मात्र तळागाळातील संबंध आणि प्रशासनाचे चांगले ज्ञान, यामुळे त्यांनी पक्ष आणि शहराच्या राजकारणात आपला प्रभाव कायम ठेवला.
नाशिक महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ४ जून रोजी पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून बडगुजर यांची शिवसेना (उद्धव ठाकरे)मधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर बडगुजर यांचा सलीमबरोबरचा व्हिडीओ पुन्हा समोर आला. शिवसेना (उद्धव ठाकरे) नेत्यांनी निदर्शनास आणून दिले की, वरील वादग्रस्त कार्यक्रमात अनेक भाजपा नेतेदेखील उपस्थित होते. २०२३ मध्ये त्यांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याबद्दल राणे मंगळवारी म्हणाले, “बडगुजर हिंदुत्वाकडे वाटचाल करत आहेत. त्यांचा मुलगा हिंदू संघटनांच्या मोर्चांमध्येही सहभागी झाला आहे.”
फडणवीस २०२३ मध्ये बडगुजर यांच्याविरुद्ध एसआयटी स्थापन करण्याचा आदेश देणाऱ्या सरकारचा भाग होते. त्यांनी बुधवारी निदर्शनास आणून दिले की, त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. “बडगुजर यांच्याविरुद्ध आरोप होते हे खरे आहे आणि नितेश राणे यांनीही एक व्हिडीओ शेअर केला होता. परंतु, चौकशी झाल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे भाजपामध्ये सामील झाल्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही… आता ते भाजपामध्ये आहेत, त्यांचा भूतकाळ सोडून आहेत आणि त्यांनी पक्षाच्या नीतिमत्तेचे पालन केले पाहिजे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
बबनराव घोलप कोण आहेत?
भाजपामध्ये बबनराव घोलप यांनीदेखील प्रवेश केला आहे. घोलप हे चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात चर्चेत असलेले नाव आहे. त्यांच्या कारकिर्दीला भ्रष्टाचाराच्या आरोपांनी धक्का बसला. कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. १३ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर, घोलप आणि त्यांच्या पत्नीला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. २०१४ मध्ये न्यायालयाच्या निर्णयामुळे अपात्र ठरवण्यात आल्यामुळे घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून माघार घेतली. फेब्रुवारी २०२४ पासून घोलप शिवसेना (उद्धव ठाकरे)बाहेर आहेत. त्यांनी पक्ष वारिष्ठांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचे सांगत राजीनामा दिला होता.