Top Five Political News in Today : माझी लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला, तर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली. शरद पवार यांनी मतचोरीच्या आरोपावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं, तर शेतकऱ्यांना २२१५ कोटींची मदत दिली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. अमित शाहांच्या आदेशामुळेच धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात आज दिवसभरात घडलेल्या या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
लाडकी बहीण योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. आई-वडिलांच्या नंतर सर्वात मोठं नातं हे बहीण भावाचं असतं, पण या निर्मळ नात्याचा सरकारने अपमान केला, अशी टीकाही त्यांनी केली. लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करताना १४ हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ कसा काय घेतला? असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला. “सुरुवातीला २ कोटी ३८ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. आता त्यातून २६ लाख म्हणजे दहा टक्क्यांहून अधिक महिलांना का वगळण्यात आलं? या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी सुळे यांनी केली. त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढून तपास पारदर्शकतेने झाला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना पालकमंत्री अजून जिल्ह्यांमध्ये आढावा घ्यायला गेले नाहीत. या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे. गरज पडल्यास बचाव पथकाची अतिरिक्त पथके तैनात करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली. शेतकऱ्यांना पीकविम्याचा फायदा होत नाही, त्यामुळे सरकारने निवडणुकीच्या आधीचा जो जीआर आहे त्यानुसार मदत करावी. प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, असंही वडेट्टीवार म्हणाले.
आणखी वाचा : BJP Mla Aditi Singh : काँग्रेसमधून आलेल्या आमदार अदिती भाजपाला डोईजड? कारण काय?
मतचोरीच्या आरोपावरून शरद पवारांचा भाजपाला टोला
गेल्या वर्षीच्या लोकसभा व त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. मतदार याद्यांमधून नावं वगळण्याचे किंवा नव्याने समाविष्ट करण्याचे प्रकार घडले असल्याचा दावा करीत त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. राहुल यांच्या आरोपांना भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देत आहेत. याच मुद्द्याला हाताशी धरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. “राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते ही संसदीय लोकशाहीतली एक स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे ते मांडत असलेल्या आक्षेपांची नोंद संबंधित संस्थेनं घेतली पाहिजे”, असं पवार म्हणाले. “राहुल गांधींनी निवडणूक आयोगासंदर्भात टीका-टिप्पणी केली की त्याचं उत्तर आयोग देत नसून भाजपाचे नेते देत आहे. हा विषय भाजपाचा नाही, तर निवडणूक आयोगाशी संबंधित आहे”, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून नुकसानभरपाईची घोषणा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही. आतापर्यंत राज्य सरकारने ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांच्या मदतीचे जीआर काढले आहे, अशी माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असंही फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारकडून मदत येण्यासाठी वेळ लागेल. कारण सगळे मूल्यमापन करून एकच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जातो, नंतर मदत येते, पण तोपर्यंत राज्य सरकार थांबणार नाही, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
अमित शाहांच्या आदेशामुळे धनंजय मुंडेंना दूर केलं : संजय राऊत
‘मला रिकामं ठेवू नका, एखादी जबाबदारी द्या’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोमवारी कर्जतमधील एका कार्यक्रमातून पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यांच्या या मागणीला सुनील तटकरे यांनीही प्रतिसाद दिला. त्यामुळे धनंजय मुंडेंना लवकरच मंत्रिपद मिळणार अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. “अमित शाहांच्या आदेशामुळे मुंडेंना मंत्रिपदापासून दूर करण्यात आलं. त्यात अजित पवारांची फार काही भूमिका असेल असं मला वाटत नाही. कारण त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मूळ मालक दिल्लीत बसले आहेत”, असा टोला संजय राऊतांनी लगावला. कोणताही राजकीय नेता कधीच रिकामा राहत नाही. तो स्वत:च काम काढत असतो, असेही ते म्हणाले.