कोल्हापूर : भांडण शेजाऱ्यांचे पण वाद उफाळला कोल्हापुरातील ठाकरे – शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शेजारी राहणाऱ्या राजेश वरपे व कुटुंबीयांना मारहाण केल्याचा मुद्दा घेऊन ठाकरे सेनेने क्षीरसागर यांच्या विरोधात वारे तापवले आहे. ‘मी सुशिक्षित गुंड’ असे विधान करणारे क्षीरसागर यांनी कृतीतूनच दाखवून दिले असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

कोल्हापुरातील शिवसेना आणि गटबाजी हे अतुट समीकरण आहे. पूर्वीपासूनच माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात वाद कायम राहिला. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सवतासुभा मांडल्यावर क्षीरसागर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेतील गटबाजी जुंपली होती. क्षीरसागर यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असा आरोप करून ठाकरे सेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले व त्यांच्या समर्थकांनी राजेश क्षीरसागर यांचा शिवसेना फलकावरील फोटो काढून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तेव्हा क्षीरसागर गोहत्ती येथे होते. तेथून त्यांनी एका चित्रफितीद्वारे इंगवले यांना प्रत्युत्तर देताना ‘तू गुंड आहेस. मी सुशिक्षित गुंड आहे. मी एकनाथ शिंदे यांचा पट्ट्या आहे. तुला सोडणार नाही,’ असा गर्भित इशारा दिला होता.

हेही वाचा – पोटनिवडणुकीवरून पुण्यातील राजकीय पक्षांमध्ये संभ्रम

आता शेजाऱ्याच्या भांडणाच्या प्रकरणावरून क्षीरसागर यांच्या गुंड या विधानाचा ठाकरे सेनेने खुबीने वापर केला आहे. क्षीरसागर आणि राजेंद्र वरपे हे दोघे शिवगंगा संकुलात एकत्र राहतात. क्षीरसागर कुटुंबीयांच्या वारंवार गच्चीवर पार्ट्या होत असतात. त्याचा त्रास होतो असे वरपे यांचे म्हणणे आहे. याबाबत वरपे कुटुंबीयांनी क्षीरसागर यांना समजावण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा राजेश क्षीरसागर व त्यांचा मुलगा ऋतुराज या दोघांनी राजेंद्र वरपे व त्यांच्या पंधरा वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेची तक्रार सुरुवातीला पोलिसांकडे गेली. पण त्यांनी टाळाटाळ केल्यावर ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश कवठेकर यांना निलंबित करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.

याप्रकरणी पोलीस पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर लेखी तक्रार पोलिसांमध्ये दाखल झाली. याचवेळी वरपे यांच्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका चित्रफितीच्या माध्यमातून गाऱ्हाणे मांडले. ‘मुख्यमंत्री साहेब, तुमच्या जवळचे सहकारी राजेश क्षीरसागर हे आम्हा कुटुंबियांना वारंवार त्रास देतात. वडील समजवायला गेले तेव्हा क्षीरसागर व त्यांचा मुलगा ऋतुराज या दोघांनी वडील व भावाला बेदम चोप दिला. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करावी लागेल’, असा इशारा दिला.

क्षीरसागर-वरपे या शेजाऱ्यांचा हा अंतर्गत वाद होता. पण क्षीरसागर साधार गुंतले आहेत म्हटल्यावर ठाकरे शिवसेनेने त्यात उडी घेतली. शिवसेनेच्या दोन गटांतील वाद या निमित्ताने पुन्हा उफाळून वर आला. वरपे कुटुंबियांना दमदाटी केल्याबद्दल क्षीरसागर यांचे पद मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे सेनेकडून करण्यात आली. राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिमेला तडा देण्यात ठाकरे गट बराच अंशी यशस्वी ठरला.

हेही वाचा – अनिल गायकवाड यांच्या रस्ते विकास मंडळातील नियुक्तीमुळे लातूरच्या उमेदवारीचा गुंता सुटला

तक्रारदार वादग्रस्त व्यक्तिमत्व

क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार करणारे राजेंद्र वरपे हे काही स्वच्छ आहेत अशातला भाग नाही, असा मुद्दा राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी मांडला आहे. वरपे यांच्या विरोधात खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केल्याच्या रागातून विरोधकांनी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात बदनामीचे षड्यंत्र रचले आहे. वरपे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी क्षीरसागर यांनी पुढाकार घेतल्याच्या रागातून महाविकास आघाडी प्रणित खाजगी सावकार एकवटले आहेत. क्षीरसागर यांची बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ,अशी मागणी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली. तूर्तास राजेश क्षीरसागर या प्रकरणी थेट भाष्य केलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलींचा वापर चिंताजनक

दीपक पिराळे, केटरिंग व्यावसायिक सीमा पाटील यांनी वरपे यांची खाजगी सावकारीतून असह्य वसुली, मारहाण केल्याची माहिती माध्यमांना दिली. तर पिराळे यांच्या मुलीने एका चित्रफितीच्या माध्यमातून वरपे यांनी दिलेल्या त्रासाची माहिती देऊन कारवाई न केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यामुळे भांडण क्षीरसागर, वरपे, पिराळे अशा ज्येष्ठांचे असले तरी या वादात मुलींना गुंतवण्याच्या प्रकाराचीही चर्चा होत राहिली. या निमित्ताने क्षीरसागर यांच्या जुन्या वादाचे प्रकारही चर्चेत आले आहेत. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात वाढदिवसावेळी राजेश क्षीरसागर यांनी तलवारीने केक कापला होता. तेव्हाही रविकिरण इंगवले यांनी राज्य सरकारच्या दबावाला बळी न पडता क्षीरसागर यांच्या विरोधात शस्त्रास्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती. तर त्याला क्षीरसागर यांनी चांदीची तलवार शस्त्र नाही आणि ती अनेकांच्या संग्रहात असते, असे उत्तर दिले होते.