अभाविप, तेलुगू देशम, भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस, असा राजकीय प्रवास करणारे रेवंत रेड्डी यांची तेलंगणाच्या मुख्यंत्रीपदी निवड झाली आहे. पक्षांतर्गत विरोध असतानाही पक्षाने रेड्डी यांना संधी दिली आहे. यामुळेच पक्षात एकवाक्यता राखण्याचे मोठे आव्हान रेड्डी यांच्यासमोर असेल.

रेवंत रेड्डी हे २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. तेव्हापासून रेड्डी आणि काँग्रेसमधील जुन्याजाणत्या नेत्यांचे सूर जुळले नव्हते. रेड्डी यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून काही नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. ५४ वर्षीय अनुमुला रेवंत रेड्डी यांची आतापर्यंतची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. विधान परिषद निवडणुकीत मतांसाठी पैसे वाटल्याच्या आरोपावरून रेड्डी हे तुरुंगातही जाऊन आले आहेत. तेलंगणातील वादग्रस्त ‘व्होट फाॅर नोट’ घोटाळ्याशी रेवंत रेड्डी यांचे नाव जोडले गेले होते. विधान परिषद निवडणुकीत नामनियुक्त आमदाराला तेलुगू देशमला मत देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर होता. या प्रकरणात रेड्डी यांना अटकही झाली होती.

हेही वाचा : ममता बॅनर्जी, अखिलेश यांची काँग्रेसवर टीका, पाच राज्यांच्या निकालानंतर इंडिया आघाडीत अस्थिरता!

विद्यार्थी दशेत अभाविपशी जोडले गेलेले रेवंत रेड्डी कोणत्याच राजकीय पक्षात स्थिरावले नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पराभव करणे या एकमेव उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रेवंत रेड्डी यांचा राजकीय प्रवास चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीमधूनच झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. पुढे त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देशममध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरी मतदारसंघातून निवडून आले होते.

हेही वाचा : धाराशिवमध्ये बहु झाले इच्छुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मावळते मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, घराणेशाहीवर रेवंत रेड्डी तुटून पडले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे तेलंगणात नियोजन करण्यात रेड्डी यांची भूमिका महत्त्वाची होती. राहुल गांधी यांच्या यात्रेला तेलंगणात चांगला प्रतिसाद मिळाला होता. निवडणुकीपूर्वी राज्य काँग्रेसमधील नेत्यांची तोंडे चोहोबाजूला होती. रेवंत रेड्डी यांचे अन्य नेत्यांशी अजिबात पटत नव्हते. पण निवडणूक जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न, के. चंद्रशेखर राव यांना लक्ष्य केल्याने काँग्रेसला झालेला फायदा यातून पक्षाने रेवंत रेड्डी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली आहे.