जळगाव: दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदारांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसमधून अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील महायुतीत धुसफूस वाढली आहे. संबंधितांच्या प्रवेशाला कडकडून विरोध केल्यानंतरही अजित पवार गटाने आपले काहीच न ऐकल्याने शिंदे गटाने आदळआपट सुरू केली आहे. त्यात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार गटाला लक्ष्य करतानाच महायुतीत बाहेरून आलेल्यांचे स्वागत करण्याची सावध भूमिका घेतल्याने शिंदे गटाच्याविरोधाची धार बोथट झाली आहे.
शरद पवार गटाचेनेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर लगेच अजित पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यांना प्रवेश देण्यासाठी पक्षाध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही अनुकूल होते. मात्र, अजित पवार गटाच्या जळगावमधील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवकर यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. दरम्यान, देवकर यांच्यासारख्या अनुभवी नेता आपल्यापक्षात आला पाहिजे, या विचाराने भाजप नेत्यांशी संपर्क साधला होता.
मात्र, देवकर यांची अजित पवार गटाकडे असलेली ओढ कायम राहिली. हीच संधी साधून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी देवकर यांनामहायुतीचे घटक पक्ष असलेल्या कोणत्याच पक्षाने प्रवेश देऊ नये म्हणून संपूर्ण ताकद लावली. त्यामुळे देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश तब्बल चार महिने बारगळला.
देवकर एकटे असेपर्यंत अजित पवार गटाने त्यांच्या प्रवेशाचे फारसे मनावर घेतले नव्हते. मात्र, देवकर यांच्याबरोबर शरद पवार यांचे खंदे समर्थक माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, चोपड्याचे माजी आमदारकैलास पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे, जळगाव जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील यांनी शेकडो समर्थकांसह प्रवेशाची तयारी दाखविल्यावर अजित पवार गटानेफार आढेवेढे न घेता थेटप्रवेशाची तारीख ठरवून टाकली. सर्व काही मनाविरूद्ध घडल्यानंतर अपेक्षेनुसार शिंदे गटाची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली.
आपला तीव्र विरोध असतानाही खासकरून माजी मंत्री देवकर यांना पक्षात प्रवेश दिला म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांचा संताप झाला आहे. अजित पवार यांना आपल्या कृतीचा मोठा पश्चाताप होईल, असा शापही त्यांनी देऊन टाकला. मंत्री गिरीश महाजन यांनी बघ्याची भूमिका न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले.महायुतीत विरोधकांना प्रवेश देताना त्यांची राजकीय पार्श्वभूमी विचारात घेण्याचे ठरले होते.आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी संकेतांचा भंग केल्याचा आरोप त्यांनीकेला.
मात्र, जे झाले ते चांगले झाले. शरद पवार गटातून अजित पवार गटात आलेल्यांचे आपण स्वागत करतो. कारण ते दुसऱ्या पक्षातून महायुतीमध्ये येत आहेत, असेही गोंधळात टाकणारे विधान त्यांनी केले. महाजन यांनी एकिकडे टीका करताना दुसरीकडे थोडी सावध भूमिका घेऊन एक प्रकारे अजित पवार गटाच्या कृतीला प्रोत्साहनच दिल्याने शिंदे गटाची पुरती कोंडी झाली आहे.