आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासून तयारी सुरू केली आहे. भाजपाचे केंद्रातील नेते वेगवेगळ्या राज्यांत जाऊन नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांचा प्रचार-प्रसार करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये सभांना संबोधित करत भाजपा सरकारच्या काळात झालेल्या कामांची माहिती दिली. यासह त्यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात काहीही काम झालेले नाही, असा दावा केला. विशेष म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळात देशात दहशतवाद फोफावला होता. आता मात्र भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत झाली आहे, असे अमित शाह म्हणाले.

‘मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार दुबळे’

अमित शाह रविवारी (११ जून) तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभांना संबोधित केले. विशाखापट्टणम येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी यूपीए सरकारवर टीका केली. “मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार दुबळे होते. त्यांच्या सरकारच्या काळात कोणीही आलिया, मालिया, जमालिया भारतात प्रवेश करायचे आणि बॉम्बस्फोट घडवून आणायचे. या लोकांवर कारवाई करण्याची हिंमत यूपीए सरकारमध्ये नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील ९ वर्षांत देशात अंतर्गत सुरक्षा प्रस्थापित करण्याचे काम केले. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अवघ्या १० दिवासांच्या आत भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला,” असे अमित शाह म्हणाले.

हेही वाचा >> दिव्यातील निधी पेरणीतून मनसे आमदार राजू पाटलांची कोंडी

अमित शाह यांनी यूपीए सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. “युपीए सरकारच्या १० वर्षांमध्ये साधारण १२ लाख कोटी रुपायांचा भ्रष्टाचार झाला. मात्र मोदी सरकारच्या मागील ९ वर्षांच्या काळात कोणीही भ्रष्टाचाराचा अद्याप एकही आरोप करू शकलेला नाही,” असे अमित शाह म्हणाले.

४ वर्षांत आंध्र प्रदेशमध्ये फक्त भ्रष्टाचार- अमित शाह

यावेळी अमित शाह यांनी भाजपाने आंध्र प्रदेशमध्ये विजय मिळवला पाहिजे, असे कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. शाह यांनी यावेळी वाएसआरसीपी पक्षावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “मागील चार वर्षांच्या काळात वायएसआर जगनमोहन रेड्डी सरकारने भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. अल्लुरी सीतारामा राजू यांच्यासारख्या महापुरुषांच्या भूमीत अशा प्रकारचा भ्रष्टाचार पाहून मला दु:ख होत आहे. वायएसआरसीपी पक्षाचा या भ्रष्टाचारामध्ये समावेश आहे,” असा गंभीर आरोप अमित शाह यांनी केला.

हेही वाचा >> उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या माजी आमदाराची ‘लव्ह जिहाद विरोधी’ यात्रा; हायकमांडकडून मात्र यात्रा थांबवण्याचा आदेश!

केंद्राच्या निधीवर आंध्र प्रदेश सरकारची पोस्टरबाजी- अमित शाह

त्यांनी यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जहनमोहन रेड्डी यांच्यावरही टीका केली. “आमचे सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करेन, असे रेड्डी सांगायचे. मात्र देशात शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात आंध्र प्रदेश हे तिसरे राज्य आहे. मोदी यांनी दिल्लीहून ११ कोटी शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये पाठवले. मात्र जगनमोहन रेड्डी यांनी हे पैसे वाएसआर रायथू भरोसा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना दिले. केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांसाठी दिलेल्या निधीतून आंध्र प्रदेश सरकार पोस्टरबाजी करत आहे,” अशी टीका अमित शाह यांनी केली.

तमिळनाडूमध्ये भाजपाचा २५ जागांवर विजय व्हयला हवा- अमित शाह

चेन्नई येथे बोलताना त्यांनी तमिळनाडू येथे भाजपाचा लोकसभा निवडणुकीत किमान २५ जागांवर विजय झाला पाहिजे, असे कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. यावेळी बोलताना मोदी यांना मागील ९ वर्षांपासून पाठिंबा दिल्यामुळे तमिळनाडूच्या जनतेचे आभार मानले. “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचाच विजय झाला पाहिजे. तमिळनाडूमध्ये भाजपा चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे. यासह तमिळनाडू येथून अनेकांना केंद्रीय मंत्रिपद मिळेल, असाही मला विश्वास वाटतो,” असे अमित शाह म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>‘फर्टिलाइजर जिहाद’ संपविण्याची भाजपाची घोषणा; विरोधक म्हणाले, नवे नवे जिहाद काढून मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रकार

तमिळनाडू राज्यात लोकसभेच्या एकूण ३९ जागा आहेत. त्यामुळे केंद्रात सत्ता हवी असेल तर येथे भाजपाचा किमान २५ जागांवर विजय व्हायला हवा, असे अमित शाह पुन्हा-पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना सांगत होते. त्यामुळे आगामी काळात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये भाजपा कशी कामगिरी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.