ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढत्या संवादामुळे राज्यात नव्या राजकीय समिकरणांची चर्चा एकीकडे जोरात असतानाच मनसेचे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकमेव आमदार राजू पाटील यांची मात्र कोंडी करण्याची व्युहरचना शिंदे यांच्या गोटात आखली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दिवा उपनगरात ६१० कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ सोहळा नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांच्या लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दिव्यात यानिमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या जंगी सोहळ्यात ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांना दिले गेलेले महत्त्व हे मनसे आमदार राजू पाटील यांच्या समर्थकांसाठी अस्वस्थतेचे नवे कारण ठरले आहे. दिव्यातील या विकासकामांच्या सोहळ्यापासून आमदार पाटील यांना दूर ठेवताना खासदार शिंदे आणि मढवी हेच दिव्यातील विकासाचे शिल्पकार अशी वातावरण निर्मीती करण्यात शिंदे गट यशस्वी ठरल्याने आमदार पाटील आणि खासदार शिंदे यांच्यातील संघर्षाला आगामी काळात नवे धुमारे फुटण्याची शक्यता अधिक आहे.
हेही वाचा – पाणी टंचाई, कापूसप्रश्नामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांची कोंडी
ठाणे महापालिका हद्दीत मोडत असलेल्या दिवा या उपनगरातून आठ नगरसेवक निवडून जातात. दिवा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सहा वर्षांपुर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी शिवसेनेला शह देण्यासाठी प्रचाराचा धुरळा उडविला होता. भाजपला निवडून द्या दिव्याची कचराकुंडी महिनाभरात हलवितो, असा शब्दही फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतरही येथील मतदारांनी आठच्या आठ जागा शिवसेनेच्या पदरात टाकल्या. हेच समिकरण पुढे विधानसभा निवडणुकीतही कायम राहील हा शिवसेना नेत्यांचा अंदाज मात्र चुकला. या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी ऐनवेळेस रद्द करण्यात आली आणि त्यांच्या जागी डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना रिंगणात उतरविण्यात आले. खासदार शिंदे यांच्याशी असलेल्या विसंवादाचा फटका भोईर यांना बसला. शिंदे यांच्या सांगण्यावरूनच भोईर यांचा पत्ता कापण्यात आला आणि तेथूनच या मतदारसंघात शिवसेनेत दुहीचे वारे वाहू लागले.
डोंबिवलीचा ग्रामीण पट्टा, २७ गाव परिसर, पलावा यासारख्या भागांत वर्चस्व राखणारे राजू पाटील यांनी दिव्यातही म्हात्रे यांना धोबीपछाड देत सहा हजारांच्या फरकाने ही जागा जिंकली. वरवर पहाता हा पराभव म्हात्रे यांचा असला तरी पाटील यांचा विजय खासदार शिंदे यांना खरा धक्का होता. हा पराभव जिव्हारी लागलेले खासदार शिंदे गेल्या काही काळापासून राजू पाटील यांच्या पराभवासाठी जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसू लागले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शिंदे यांच्याकडील नगरविकास आणि सध्याच्या मुख्यमंत्रिपदाचा यासाठी पुरेपूर वापर केला जात असून, कल्याण ग्रामीण मतदारसंघात शासनाच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांच्या निधीचे पाट मोकळे केले जात आहेत.
रमाकांत मढवी हे नवे आव्हानवीर ?
दिवा शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी २४० कोटी, रस्त्यांच्या कामांसाठी १३२ कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी ६३ कोटी, आगरी-कोळी वारकरी भवनासाठी ३० कोटी, देसाई खाडीपुलासाठी ६७ कोटी, तर दिव्यात आगासन भागात नवे रुग्णालय बांधणीसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. याशिवाय खिडकाळी मंदिराकरिता १० कोटी, दातिवली तलावाच्या सुशोभीकरणासाठी २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. या सर्व कामांचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
बेकायदा बांधकामांची बजबजपुरी असलेल्या दिव्यात कधी नव्हे इतका निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला जात असल्याने खासदार शिंदे यांच्या पुढाकाराने दिव्यात यावेळी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री शिंदे यांची ढोलताशांच्या गजरात शहरभर मिरवणूक काढताना त्यांच्या वाहनात माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांना खासदार शिंदे यांच्या शेजारची जागा देण्यात आल्याने मनसेचे स्थानिक आमदार पाटील यांचे आव्हानवीर म्हणून मढवी यांच्याकडे पाहिले जात आहे.
राज्यातील राजकारणात मुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढत्या संवादामुळे सातत्याने नव्या राजकीय समिकरणांच्या शक्यता व्यक्त होत असल्या तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र खासदार शिंदे आणि आमदार पाटील यांच्यातील विसंवादाच्या चर्चाच अधिक आहेत. मागील निवडणुकीतील पराभवाचे खापर खासदार शिंदे यांच्यावरच फोडले गेल्याने तेही यंदा इरेला पेटल्याचे दिसत आहेत. यंदा पाटील यांचा आव्हानवीर दिव्यातील असावा याविषयी शिंदे गोटात पुरेशी स्पष्टता आहे. त्यामुळेच कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या बोहल्यावर मढवी यांना बसविण्याची रणनिती ठरविण्यात आल्याचे चित्र आहे.