बीड: ‘बीड जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळावे, यासाठी महाविकाआघाडीतून मोठा वाटा मिळवावा लागेल, या खासदर संजय राऊत यांच्या वाक्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला असला तरी त्यातून खूप काही राजकीय लाभ मिळेल, हा निव्वळ भ्रम असल्याचे विश्लेषण केले जात आहे. भाजपासोबत पंचवीस वर्षांच्या युतीतही जिल्ह्यात शिवसेनेला केवळ एकाच मतदारसंघापुरतेच मर्यादित राहावे लागले होते. तेच सूत्र पुन्हा महाआघाडीतही असू शकेल, अशी राजकीय परिस्थिती आहे. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी विधानसभेच्या तीन जागांवर दावा केला असला तरी एवढ्या जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणे कठीणच दिसते.

बीडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोपीय सभेत जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीड जिल्ह्यासाठी विधानसभेच्या तीन जागांची जाहीर मागणी केली. माजी मंत्री बदामराव पंडित यांनीही बीड, गेवराई, माजलगावची जागा शिवसेनेला सोडावी, आम्ही सर्वजण तिन्ही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ, असा शब्द दिला. वास्तविक विधानसभेच्या सहापैकी बीड, परळी, आष्टी-पाटोदा-शिरूर, माजलगाव या चार मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार, तर गेवराई आणि केज मतदारसंघात भाजपा प्रतिनिधित्व करत आहे. शिवसेनेची भाजपासोबत युती असतानाही भाजपाने शिवसेनेला बीड हा एकाच मतदारसंघ दिला होता. त्यावेळीदेखील शिवसेनेने बीड, माजलगाव आणि गेवराईसाठी हट्ट धरला होता. मात्र जेवढी ताकद तेवढ्याच जागा हे सूत्र भाजपाने शेवटपर्यंत कायम ठेवत शिवसेनेला जास्तीचा वाटा कधीच मिळू दिला नाही. त्यामुळे सहा मतदारसंघ असूनही शिवसेनेला फारसा प्रभाव टाकता आला नाही.

हेही वाचा – साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरात प्रथमच आमने-सामने

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट अशी महाआघाडी झाल्यास जिल्ह्यात मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी ठाकरे गटाला फार काही महत्त्व देण्याची शक्यता दिसत नाही. बीड, माजलगावमध्ये सध्या राष्ट्रवादीचे आमदार, तर गेवराई हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचा बालेकिल्ला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधोरेखित असताना या तीनपैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला सोडेल हे गणित न पटणारे आहे.

सहापैकी केज वगळता इतर सर्वच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक दिग्गज नेत्यांची ताकद आहे. त्यामुळे महाआघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसाठी एकमेव केज राखीव मतदारसंघाची जागा सोडली जाऊ शकते. त्याच दृष्टीने भाजपा नेत्या डॉ. नयना सिरसाट यांचा महाप्रबोधन यात्रेच्या सभेत संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश झाला असावा. दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा यांच्यानंतर या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नाही. अपवाद २०१२ च्या पोटनिवडणुकीत केवळ एकदा पृथ्वीराज साठे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने ही जागा जिंकली होती. त्यानंतर मात्र भाजपाच्या संगीता ठोंबरे आणि सध्या राष्ट्रवादीतूनच भाजपात गेलेल्या नमिता अक्षय मुंदडा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार होऊ शकते. केज व्यतिरिक्त एकही मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळू शकत नाही, असे सध्याची राजकीय परिस्थिती दिसते. त्यामुळे भाजपा बरोबर युतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेला मतदारसंघाचा दुष्काळ महाआघाडीतही कायम राहील असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

हेही वाचा – नागपूरचा गड बळकट करण्यासाठी फडवणीस यांचे प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुषमा अंधारेंच्या नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न

बीडमधील महाप्रबोधन यात्रेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर झालेले आरोप, कथित मारहाणीचा दावा यामुळे ही सभा राज्यभर गाजली. शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून अतिशय कमी काळात त्यांची ओळख झाली. प्रखर आणि मुद्देसूद भाषणामुळे शिवसेनेच्या वरच्या फळीतील नेत्या म्हणून अंधारेंनी आपली छाप सोडली. भाजपा आणि शिंदे गटावर अक्षरशः तुटून पडणाऱ्या सुषमा अंधारे शिवसेना ठाकरेत वजनदार नेत्या ठरल्या. सुषमा अंधारे यांनी आपल्या मुळ गाव परळी (जि. बीड) येथे सुरू केलेले कार्यालय, त्यांच्याच पक्षातील जिल्हा प्रमुखाने केलेला मारहाणीचा दावा आणि या सर्व प्रकारानंतर त्याचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना जिल्ह्यात आणून अंधारेंनी सभेसाठी ५० लाख रुपये गोळा केल्याने सभा उधळून लावण्याचा दिलेला ईशारा यातून घरच्या मैदानावरच सुषमा अंधारे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. यामागे विरोधक असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या पक्षातूनही या प्रकाराला हवा दिल्याचे चर्चिले जात आहे.