यशवर्धन कदमबांडेंमुळे निवडणुकीच्या तोंडावर धुळ्यात ठाकरे गटाला बळ तर भाजपला धक्का | The entry of Yashvardhan Kadambande into the Thackeray group in Dhule has given a big shock to the BJP print politics news amy 95 | Loksatta

यशवर्धन कदमबांडेंमुळे निवडणुकीच्या तोंडावर धुळ्यात ठाकरे गटाला बळ तर भाजपला धक्का

नगरपालिका असताना आणि नंतर महापालिका अस्तित्वात आल्यावरही शहराचे राजकारण माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या भोवतीच फिरत राहिले आहे.

यशवर्धन कदमबांडेंमुळे निवडणुकीच्या तोंडावर धुळ्यात ठाकरे गटाला बळ तर भाजपला धक्का
भाजपमधील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश

संतोष मासोळे

धुळे – महापालिकेत एकहाती सत्ता असूनही कामे होत नसल्याने भाजपमध्येच असलेला असंतोष, शिवसेनेची शिंदे गट आणि ठाकरे गट अशी उडालेली छकले, एमआयएम विरुध्द भाजप यांच्यात अधुनमधून होणारे वादविवाद असे शहराचे राजकारण सुरू असताना अचानक भाजपमधील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र यशवर्धन यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला बळ देणारा आणि भाजपसाठी धक्कादायक असा हा प्रवेश मानला जात आहे.

हेही वाचा >>>मनसेचेही मिशन बारामती : गाव तिथे शाखा

नगरपालिका असताना आणि नंतर महापालिका अस्तित्वात आल्यावरही शहराचे राजकारण माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या भोवतीच फिरत राहिले आहे. राजवर्धन यांचे शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध होते. राजवर्धन हे राष्ट्रवादीत असताना त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे युवा नेते मनोज मोरे आणि यशवर्धन यांच्यात नेहमी खटके उडत असत. वैचारिक आणि तात्त्विक मतभेदांमुळे मोरे विरुध्द यशवर्धन हा वाद विकोपाला गेला होता. या वादात राजवर्धन हे मुलाची बाजू घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज मोरे आणि संजय वाल्हे या जोडगोळीने राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भविष्यातील राजकारणाचा वेध घेत मोदी लाटेत राजवर्धन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. वडिलांपाठोपाठ यशवर्धन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. कदमबांडे घराण्यातील युवानेतृत्वही पक्षात येताच त्यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे प्रदेश प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आघाडीने अनेक कार्यक्रमही राबविले.

हेही वाचा >>>अंधेरीतील भाजपची माघार : पराभवाची भीती आणि विजयाचे हिशेब

पुढे मनोज मोरे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मोरे यांच्या माध्यमातून शिंदे गटाला मराठा चेहरा मिळाला. मोरे हे शिंदे गटात गेल्यानंतर काही दिवसांपासून राजकीय पटलावर शांत असलेल्या यशवर्धन यांनी अचानक थेट मुंबई गाठत ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील संघर्ष अधिकच धारदार बनण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे मनोज मोरे यांचा राजकीय वारू रोखणे, हे यशवर्धन यांच्यासमोरील प्रमुख लक्ष्य असणार हे निश्चितच. किंबहुना त्यासाठीच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा >>>‘भारत जोडो’ यात्रेतील आकर्षण एकच!

यशवर्धन कदमबांडे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाभ होऊ शकेल. राजवर्धन हे भाजपमध्ये असले तरी यशवर्धन हे ठाकरे गटात गेल्याने भाजपमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. यशवर्धन यांची वक्तृत्वशैली, समयसूचकता, चाणाक्षपणा आणि दूरदृष्टी या गुणांची राजकीय पातळीवर प्रशंसा केली जाते. अभ्यासपूर्ण भाषण हे यशवर्धन यांचे वैशिष्ट्ये असल्याने शिंदे गटातील स्थानिक नेत्यांना त्यांना तोंड देणे कठीण जाऊ शकते. शहरात यापूर्वी शिवसेनेकडून विधानसभेसाठी हिलाल माळी, भगवान करनकाळ, गोपाळराव केले यांच्यासारख्या दिग्गजांना तिकिटे देऊनही ते कमीअधिक मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. यामुळे युवा नेतृत्वाला उद्धव ठाकरे यांच्याकडून संधी दिली जाऊ शकते. ठाकरे गटात प्रवेशासाठी हा प्रमुख मुद्दा ठरल्याची चर्चा आहे. तसे असेल तर महिन्यापूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या स्वप्नांना तडा जाऊ शकेल. ठाकरे गटात नवे-जुने वादही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, यशवर्धन यांचे वडील माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी यशवर्धन हे ठाकरे गटात गेले असले तरी आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तरी राजवर्धन हे पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहतील काय, ही अस्वस्थता भाजपमध्ये आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-10-2022 at 15:39 IST
Next Story
मनसेचेही मिशन बारामती : गाव तिथे शाखा