अविनाश कवठेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली पाच दशके पवार कुटुंबीयांचा दबदबा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मनसेच्या मिशन बारामतीची रणनीती निश्चित झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील मात्र पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागाबरोबरच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार आहे. त्यासाठी गावनिहाय मनसेची शा़खा आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे.

चौक तिथे झेंडा आणि वॉर्ड तिथे शाखा ही रणनीती महापालिका निवडणुकीत मनसेकडून राबविण्यात आली. त्याचा फायदा मनसेला झाला. हीच रणनीती आता लोकसभा निवडणुकीसाठी राबविण्यात येणार असून शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

हेही वाचा : ठाण्यात एकनाथ शिंदे विरोधकांची मोट बांधणी सुरू; संजय घाडीगांवकर यांच्या माध्यमातून ठाकरे गटाची रणनीती

अडीच वर्षांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली असून त्यात मनसेनेही उडी घेतली आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्हातील बारामतीसह शिरूर आणि मावळ मतदारसंघात मनसेने निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कट्टर राज समर्थक वसंत मोरे यांच्याकडे बारामती लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे शाखा आता उघडण्यात येणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे यांच्या प्रभागातील सत्तर टक्के भाग येतो. लोकसभेची तयारी करताना आगामी महापालिका निवडणुकीतही या कामांचा फायदा मनसेला होईल, असा अंदाज आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील सात तालुक्यांत ७९५ गावे आहेत. या गावातील बहुतांश नागरिक कामानिमित्त कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, हडपसर आदी भागात येतात. काहींचे या भागात वास्तव्यही आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघातील शहरी भागावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

हेही वाचा : अंधेरीतील भाजपची माघार : पराभवाची भीती आणि विजयाचे हिशेब

बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेची शाखा असली तरी ती ठराविक लोकांपुरतीच मर्यादित राहिली आहे. शाखा अध्यक्ष हा मनसे संघटनेचा कणा आहे. त्यामुळे गाव पातळीवर शाखा उघडण्याचा संकल्प मनसेने केला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील काही तालुक्यात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय, स्थानिकांना नोक-या आदी मुद्देही येत्या काळात हाती घेण्यात येणार आहेत. मर्यादित राहिलेल्या पक्षसंघटनेत फेरबदल करण्यात येणार असून त्या गावातील स्थानिकांवर पक्षसंघटनेची जबाबदारी निवडणूक रणनीतीनुसार सोपविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘भारत जोडो’ यात्रेतील आकर्षण एकच!

सन २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा मतदार संघात भाजप विरोधात काम करताना मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला छुपी मदत करण्यात आली होती, अशी चर्चा त्या निवडणुकीवेळी झाली होती. मनसेचे शहरी भागातील वर्चस्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेकडे मदत मागितली होती. वसंत मोरे यांनी केलेली मदत पक्षाचे अध्यक्ष राज यांच्यापर्यंत पोहोचली होती, असेही सांगण्यात येत होते. त्या वेळची परिस्थिती आणि आताची बदललेली राजकीय परिस्थिती पाहता मनसेची ताकद या मतदारसंघात कायमच आहे. त्याचाच फायदा मनसे उठवेल असा दावा पक्षाकडून केला जात आहे. शहरी भागातील ताकदीचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत तीन प्रभागात दिसेल. बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे केवळ बारामती नव्हे तर खडकवासला, हडपसर, धनकवडी, वारजे हा भाग ही येतो या वसंत मोरेच्या विधानातूनच मनसेने शहरी भागाला दिलेले महत्त्व अधोरेखित होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns target baramati constituency raj thackeray vasant more village there mns branch pawar family bjp print politics news tmb 01
First published on: 21-10-2022 at 14:41 IST