नागपूर : राजकारणात असणाऱ्या प्रत्येकाला आमदार होण्याची संधी मिळतेच असे नाही. पण ज्यांना मिळते ते या संधीचा कितीपत फायदा करून घेतात हा प्रश्न सुद्धा महत्वाचे ठरतो. अनेकांची कारकीर्द कधी सुरू होते व कधी संपते ते कळतही नाही . अनेक जण विधिमंडळातील कामकाजावर आपली छाप पाडतात. म्हणूनच ते लक्षवेधीही ठरतात. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नागपूरच्या तीन माजी महापौर आमदारांचा कामकाजातील सहभाग लक्षवेधी ठरला. यात दोन सत्ताधारी भाजपचे व एक प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा आहे. प्रवीण दटके (भाजप), विकास ठाकरे (काँग्रेस) आणि संदीप जोशी (भाजप) असे या आमदारांची नावे आहेत . दोघे विधानसभेचे तर जोशी परिषदेचे सदस्य आहेत.
दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेले विकास ठाकरे हे विरोधी बाकावरचे तर विधानसभेत प्रथमच निवडून आलेले प्रवीण दटके आणि प्रथमच विधान परिषदेत प्रथमच आलेले संदीप जोशी हे सत्ताधारी बाकावरचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही नागपरचे महापौर होते. तिघांचीही राजकीय कारकीर्द नगरसेवक म्हणून सुरू झाली आणि विधिमंडळापर्यंत पोहचली.
विधिमंडळाचे कामकाज समजण्यासाठी सरासरी एक वर्षाचा कालावधी लागतो. ठाकरे दुसऱ्यांदा विजयी झाल्याने त्यांना कामकाजाचा अनुभव आहे. दटके काही वर्ष विधान परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे त्यांंनाही कामकाजाची माहिती आहे. पण जोशींचे हे पहिलेच अधिवेशन आहे. तीनही सदस्यांमध्ये दटकेंचा सभागृहाच्या कामकाजातील सहभाग लक्षणीय स्वरुपाचा आहे. प्रश्नोत्तराचा तास असो, विधेयकावरील चर्चा असो, अभिनंजनाच्या प्रस्तावावरील चर्चा असो दटके यांनी त्यावर मांडलेले मत अभ्यासपूर्ण असल्याने दखलपात्र ठरते.
नागपूरच्या गुटख्याचा प्रश्न , झोपडपट्टीवासींना पट्टे वाटपाचा मुद्या , शहरातील कायद्या व सूव्यवस्था वाढती गुन्हेगारी आदी मुद्यांवर त्यांनी मुद्देसूदपणे आपली भूमिका ठामपणे मांडली. वास्तविक सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला सरकारच्याबाजूनेच भूमिका मांडण्याचे बंधन असल्याने ती मांडताना त्याला सरकार विरोधी किनार नसावी याची काळजी अधिक घ्यावी लागते. नागपूर हे मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने तर ते अधिक घ्यावी लागते.
दटके मात्र ही तारेवरची कसरत अत्यंत उत्तमपणे करीत असल्याचे दिसुून आले. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागा फ्री होल्ड करा ही त्यांनी केलेली मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली लोकमागणी आहे. ती पूर्ण झाली तर सरासरी नागपुरातील ५० हजार भूखंड मालकांना त्याचा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी् नियंत्रण विधेकावर चर्चा करताना शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडून या प्रश्नातील दाहकता सभागृहात मांडली.
नागपूरच्या प्रश्नावर ठाकरे आक्रमक
मागच्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा नागपूर पाण्यात बुडाले, या मुद्यावर ठाकरे यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भाजप नेत्यांवर टीका केली. एक लाख कोटी रुपयांचे विकास कामे केल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जातो, त्यातील फोलपणा ठाकरे यांनी उघड केला. नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी झुडपी जंगल कायद्यात राखीव असणाऱ्या जमिनीवर अवैध बांमधकाम कसे होऊ दिले असा सवालकरताना त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शालार्थ आयडी घोटाळ्यावर जोशी आक्रमक
नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुद्दा संदीप जोशी यांनी विधान परिषदेत सविस्तरपणे मांडला. यातून त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे दिसून आले. अनेक वर्षापासून बीनबोभटपणे सुरू असलेल्या शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी विशेष पथकामार्फत करावी, अशी मागणी जोशी यांनी केली. या शिवायही विविध मुद्यांवर त्यांनी मत मांडून कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवला.
आमदारांना विधिंमंडळात लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवले जातात, ते जर ते मांडत असतीलतर त्यात दखल घेण्यासारखे काही नाही, पण अलीकडच्या काळात मौौनी आमदरांची संख्या वाढत असल्याने तसेच लोकांच्या प्रश्नांऐवजी अनावश्यक बाबींवरच अधिक जोर देऊन प्रसिद्धीच्या झोतात राहणेच पसंत करणारे सदस्य अधिक असल्याने आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सांसदीय आयुधांचा वापर करून मांडणे व त्याची सरकारदरबारी नोंद करवून घेणे महत्वाचे ठरते, नागपूरचे तीन माजी महापौर आमदार ते करताना दिसत असल्याचे समाधान आहे.