नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज मंगळवारी सहा दिवसांनंतर सुरळीत सुरू झाले असले तरी त्यामागे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील तीव्र मतभेद कारणीभूत ठरले आहेत. अदानी प्रकरणावरून संसदेचे कामकाज बंद पाडण्याचे काँग्रेसचे डावपेच तृणमूल काँग्रेस व समाजवादी पक्षाने मोडून काढल्यामुळे काँग्रेसला माघार घ्यावी लागल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> धुसफूस सुरूच; शपथविधीबाबत बावनकुळेंच्या घोषणेवर शिंदे गटातून नाराजीचा सूर

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आग्रहामुळे काँग्रेसने अदानी समूहाच्या लाचखोरीचे प्रकरण संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित केले होते. मात्र, अदानीपेक्षा लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका तृणमूलच्या खासदारांनी घेतली होती. अदानीपेक्षा उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचारावर चर्चा झाली पाहिजे, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसला ठणकावून सांगितले होते. ‘सप’च्या खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन लोकसभेत संभल प्रकरणावर चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य केल्याने तृणमूल काँग्रेस व सपने संसदेचे कामकाज शांततेत सुरू ठेवले जाईल असे आश्वासन दिले. इंडिया आघाडीतील दोन्ही पक्षांच्या ठाम भूमिकेमुळे काँग्रेसचा नाइलाज झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राहुल गांधींनीही तडजोड केल्याचे मानले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठक-निदर्शनांवर बहिष्कार

राज्यसभेचे विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात दररोज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्येही इतर पक्षांनी अदानीच्या मुद्द्याचा आग्रह न धरण्याची विनंती केली होती. या बैठकांमध्ये तृणमूलने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. संसदेच्या आवारात मंगळवारी काँग्रेससह इतर विरोधकांनी अदानीच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. राज्यसभेत ‘सप’च्या सदस्यांनी संभल हिंसाचारावर सविस्तर भूमिका मांडली.