चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत वरोरा व राजुरा या दोन मतदारसंघांत अनुक्रमे करण देवतळे व देवराव भोंगळे यांनी विजय संपादन केला. त्यांच्या रूपात चंद्रपूर जिल्ह्याला दोन तरुण आमदार मिळाले आहेत, तर पराभूत होऊनही मुकेश जिवतोडे, कृष्णा सहारे, प्रवीण पडवेकर, डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. सतीश वारजुरकर हे आश्वासक युवा चेहरेदेखील या निवडणुकीने दिले आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, कीर्तीकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार, हे चार जुने चेहरे विजयी झालेत. मात्र, या ज्येष्ठ व राजकारणात वर्चस्व असलेल्या मातब्बर नेत्यांना लढत देऊन पराभूत झालेल्या नव्या दमाच्या तरुण उमेदवारांनीही सर्वांचे लक्ष वेधले. भाजपने करण देवतळे व देवराव भोंगळे असे दोन तरुण उमेदवार दिले होते, त्यांनी विजय संपादन केला. वरोराचे आमदार देवतळे यांची पार्श्वभूमी पूर्णपणे राजकीय आहे. त्यांचे आजोबा, वडील आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद अध्यक्ष, असा राजकीय प्रवास केला आहे. स्वबळावर तसेच त्यांचे राजकीय गुरू मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने त्यांनी आमदारकीपर्यंतची मजल मारली. विशेष म्हणजे, भोंगळे यांनी आजवर लढलेल्या सर्वच निवडणुका जिंकल्या आहेत.

हेही वाचा >>> प्रस्थापितांनाच मतदारांची साथ, नवख्यांना नाकारले; अकोला, वाशीम जिल्ह्यात पाच आमदारांना पुन्हा संधी

याशिवाय, वरोरा मतदारसंघात अपक्ष लढत देऊन ४९ हजारांपेक्षा अधिक मते घेणारे मुकेश जीवतोडे यांनी सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राहिलेले जीवतोडे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितली होती. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हट्टामुळे जीवतोडे यांना उमेदवारी मिळाली नाही. परिणामी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्यापेक्षा दुप्पट मते घेत स्वतःची छाप सोडली.

ब्रम्हपुरी मतदारसंघात भाजपचे कृष्णा सहारे यांनीही एक लाखापेक्षा अधिक मते घेत राज्यातील नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले सहारे कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांचेही राजकारणातील भवितव्य उज्ज्वल असल्याचे बोलले जाते.

डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मुनगंटीवार यांना कडवी झुंज दिली. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असती तर मुनगंटीवार यांना यावेळची निवडणूक अधिक अवघड गेली असती, असे बोलले जाते.

हेही वाचा >>> रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची आशा; योगेश कदम यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार ? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रपूर मतदारसंघात प्रवीण पडवेकर या दलित उमेदवाराने ८४ हजारांपेक्षा अधिक मते घेत सर्वांनाच धक्का दिला. काँग्रेसला या मतदारसंघात मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. यापूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बीता रामटेके यांना ५० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. भाजपचे विद्यमान आमदार २०१४ मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असताना त्यांना देखील ५० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. त्यानंतर एखाद्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराने घेतलेली ही सर्वाधिक मते आहेत.

चिमूर मतदारसंघात डॉ. सतीश वारजुरकर यांनी एक लाख सहा हजारपेक्षा अधिक मते घेत सर्वांचे लक्ष वेधले.

जिवतोडे, सहारे, पडवेकर,डॉ. गावतुरे व डॉ. वारजुरकर यांना भविष्यातील राजकारणात उंच शिखर गाठायचे असेल तर जनसंपर्क व कामातील सातत्य टिकवून ठेवावे लागेल.