ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात अखेर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत दोन बंधू अधिकृतपणे एकत्र येतील तेव्हा येतील ठाण्यातील वेगवेगळ्या प्रश्नावर ठाण्यात शिंदेविरोधात रणशिंग फुकायचे असा निर्णय या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर गेल्या आठवड्यात विरोधी पक्षातील नेत्यांची एकत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे ठाण्यातील वाहतूक कोंडी, महापालिकेतील भ्रष्टाचार तसेच इतर प्रश्नांवर सोमवारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेकडून मोर्च काढला जाणार आहे.
या मोर्चात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते अधिकृतपणे सहभागी होणार नाहीत. मात्र या आंदोलनाला दोन्ही काॅग्रेसचा पडद्यामागून पाठींबा असेल अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. ठाण्यात शिंदे यांच्याविरोधात वातावरणनिर्मीतीसाठी हा मोर्चा महत्वाचा असेल असा दावा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. ठाण्यातील वाहतूक कोंडी संबंधी मध्यंतरी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घोडबंदर तसेच महामार्गावर मोर्चा काढला होता. या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते सहभागी झाले नव्हते. सोमवारी मात्र महापालिका मुख्यालयावर एकत्रित मोर्च काढला जाणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथून हा मोर्चा निघेल, असे राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.
आव्हाडांची साथ…आंदोलनाची सुरुवात
जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात आठवडाभरापुर्वी राजन विचारे, अविनाश जाधव आणि काॅग्रेसचे नेते विक्रांत चव्हाण यांची एकत्रित बैठक झाली होती. या बैठकीचे छायाचित्र सोशल मिडीयावर चर्चेत आले होते. या बैठकीत ठाण्यात वेगवेगळ्या प्रश्नांवर विरोधकांनी रस्त्यावर उतरायचे असा निर्णय घेण्यात आला. ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद आहे. कळव्यातील आव्हाड समर्थक नगरसेवकांचा एक मोठा गट मध्यंतरी शिंदे यांच्या पक्षात सहभागी झाला.
त्यामुळे शिंदे यांच्याविरोधात महापालिका निवडणुक लढविण्याचे मोठे आव्हान ठाकरे तसेच पवार यांच्या पक्षांपुढे असणार आहे. ठाण्यात शिंदे यांना आव्हान उभे करायचे असेल तर आतापासूनच एकत्र येऊन लोकांपुढे जावे लागेल असे या बैठकीत ठरल्याचे समजते. दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूनी निवडणुकीच्या मैदानात अजूनही एकत्र येण्यासंबंधीची कोणतीही घोषणा केलेली नाही. राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होतील का याविषयी देखील अजून स्पष्टता नाही. त्यामुळे ठाण्यात दोन्ही ठाकरे बंधूच्या पक्षांकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चात जितेंद्र आव्हाड थेट सहभागी होणार नाहीत, अशी माहिती सुत्रांनी दिली. असे असले तरी या मोर्चाच्या आखणीत त्यांना महत्वाचा सहभाग असेल असे सांगण्यात आले.
जुन्या ठाण्यावर लक्ष केंद्रीत
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर ५८ हजार २५३ मतांच्या फरकाने निवडून आले. याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना ६२ हजार १२० तर मनसचे अविनाश जाधव यांना ४२ हजार ५९२ मते मिळाली होती. दोन्ही ठाकरेंच्या उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षा अधिक मते केळकर यांना मिळाली होती. असे असले तरी या मतदारसंघातील काही प्रभागांमध्ये विचारे आणि जाधव यांनी चांगली मते घेतली होती. अशा प्रभागांवर या दोन्ही पक्षांनी आता लक्ष केंद्रीत केले आहे.